फोंडा, १ सप्टेंबर (वार्ता.) – ‘आविष्कार कला केंद्र’ आणि ‘शेतकरी बाजार कृषी सेवा केंद्र’ यांच्या वतीने खडपाबांध, फोंडा येथील रविनगरजवळील धायमोडकर सदन येथे श्री गणेशमूर्ती शाळा अन् शेतकरी बाजार हा संयुक्त उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचे
१ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक अपूर्व दळवी आणि नगरसेवक शौनक बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘शेतकरी बाजार कृषी सेवा केंद्रा’चे संचालक मनोज गावकर यांनी केंद्राच्या वतीने राबवल्या जाणार्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
कोणत्याही परिस्थितीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती खपवून घेणार नाही ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, गोवा हस्ताकला महामंडळ
चिकण मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्यांना कामगारांचा तुटवडा भासत आहे. ही समस्या मी स्वत: आणि सरकार दोघेही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत; मात्र कोणत्याही परिस्थितीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती आम्ही खपवून घेणार नाही, अशी चेतावणी गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी या वेळी बोलतांना दिली. गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीवर बंदी आहे.