चिपळूण, संगमेश्वर आणि इंदापूर तालुक्यांतील पर्यटनक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी देणार ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

अजित पवार

मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री मार्लेश्वर देवस्थान आदी क्षेत्रांना ऐतिहासिक, अध्यात्मिक, पुरातत्वीय वारसा आहे. या क्षेत्रांचा विकास करतांना पुरातत्वीय महत्त्व, ऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावे. नवीन बांधकाम करतांना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ वास्तूशी मिळते-जुळते असावे. तसेच चिपळूण, संगमेश्वर आणि इंदापूर तालुक्यांतील पर्यटनक्षेत्रांचा परिपूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या विकासकामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी दिला.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वर, तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यांतील ऐतिहासिक स्थळे, देवस्थाने आणि पर्यटनक्षेत्रांच्या विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरात रोजगार-निर्मिती करण्यास मोठा वाव आहे. त्याचा विचार करूनच कोकणातल्या पर्यटनस्थळांचा विकास करावा. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील पेढे येथील सवतसडा धबधबा, चिपळूण- गुहागर बायपास रोडवरील पुरातन बौद्ध लेणी (दगोबाची लेणी) सुशोभीकरण करणे, संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवस्थान परिसर, कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री टिकलेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे आर्च ब्रिज बांधणे, सुशोभीकरण करणे ही कामे करण्याविषयी वास्तूविशारदांची नेमणूक करण्यात यावी. पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे.
या बैठकीला आमदार शेखर निकम, आमदार दत्तात्रय भरणे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, रत्नागिरीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांसमवेत प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.