खोट्या बलात्काराच्या प्रकरणांत लोकांना अडकवून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या तरुणींच्या कारस्थानात पोलिसांचा सहभाग 

पणजी, ३० ऑगस्ट (वार्ता.) – खोट्या बलात्काराच्या प्रकरणात लोकांना अडकवून त्यांना २ गुजराती युवती ‘ब्लॅकमेल’ (धमकावून लुबाडणे) करत होत्या. यामध्ये एका महिला पोलीस अधिकार्‍यासह इतर काही पोलीस सहभागी असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याविषयी उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले, ‘‘संबंधित गुजराती युवतींशी पोलिसांचे व्यवहार आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाचेही सखोल अन्वेषण केले जाणार आहे; मात्र अजूनपर्यंत या प्रकरणी पोलिसांचा सहभाग असल्याचे आढळलेले नाही.’’

गुजरातमधील २ युवती बार्देश येथे येऊन रहात आहेत. खोट्या बलात्कार प्रकरणात लोकांना फसवतात आणि ‘ब्लॅकमेल’ करून लाखो रुपये कमावतात. या युवतींना पकडून पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना सोडून देण्याचा प्रकार घडत होता. गुजराती नागरिक असलेला किरण पटेल याने या दोन्ही युवतींच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर त्यांचे कारस्थान उघडकीस आले. या २ युवतींनी तक्रारदार किरण पटेल यांच्याकडून २ लाख रुपयांची खंडणी उकळली होती. ८ दिवसांपूर्वी कोलवाळ पोलिसांनीही या युवतींना कह्यात घेतले होते; परंतु या युवतींच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला नव्हता. (गुन्हा प्रविष्ट न करणारे, चौकशी न करता सोडून देणारे या सर्व पोलिसांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

खोट्या बलात्कार प्रकरणांत निष्पाप लोकांना फसवून त्यांना लुबाडणार्‍या संबंधित गुजराती महिला कुणालाही न घाबरता त्यांचे गैरव्यवहार करत होत्या. किरण पटेल यांनी केलेल्या तक्रारीची उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी गंभीर नोंद घेतल्याने कळंगुट पोलिसांनी दोन्ही युवतींना कह्यात घेतले. या दोन्ही युवतींसमवेत विश्वदीप गोहील या दलालाही कह्यात घेण्यात आले आहे. विश्वदीप याने काही दिवसांपूर्वी कळंगुट पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराच्या मित्राला ‘गुगल पे’च्या साहाय्याने पैसे दिले होते. ही घटना सध्या एक चर्चेचा विषय झालेला आहे. विश्वदीप गोहील याच्या आर्थिक व्यवहाराचे अन्वेषण करण्याची मागणी जोर धरत आहे.

संपादकीय भूमिका 

गोव्यातील पोलिसांचे गुन्हेगारीकरण होत आहे. पोलिसांच्या गुन्ह्यातील सहभागाची एकावर एक प्रकरणे उघड होत आहेत. हे त्वरित रोखणे आवश्यक आहे. हे असेच चालू राहिल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडून अराजक माजेल !