मोपा येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको !

आगरवाडा-चोपडे ग्रामसभेत नागरिकांची मागणी

पेडणे, २८ ऑगस्ट (वार्ता.) – आगरवाडा, चोपडे येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत मोपा विमानतळ (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) परिसरात होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाला विरोध दर्शवण्यात आला. ग्रामसभेत काहींनी ‘सनबर्न’ला समर्थन दिले, तर काहींनी मौन बाळगणे पसंत केले. सरपंच अँथनी फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली.

ग्रामसभेत माजी सरपंच अमोल राऊत प्रस्तावित ‘सनबर्न’ महोत्सवाचा विषय उपस्थित करतांना म्हणाले, ‘‘किनारी भागातील ही विकृती पेडणे तालुक्याच्या गावागावांत पोचल्यास युवकांचे भवितव्य नष्ट होईल. यामुळे ‘सनबर्न’ पेडणे येथे नको. उपस्थितांपैकी काहींनी ‘सनबर्न’ महोत्सव मोपा परिसरात झाल्यास तालुक्यातील नागरिकांना रोजगार मिळणार असल्याने त्याला विरोध करायला नको’, असे मत व्यक्त केले. (‘सनबर्न’ महोत्सव पाश्चात्त्य विकृती आहे. ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे नागरिक मृत्यू पावल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अल्प लाभापोटी युवकांना व्यसनाधीन करणार्‍या ‘सनबर्न’ला पाठिंबा देणे कितपत योग्य आहे ? – संपादक) सरपंच अँथनी फर्नांडिस म्हणाले, ‘‘सनबर्न’ महोत्सवाविषयी मी अनभिज्ञ आहे. सरकारने लोकांना विश्वासात घेऊन या महोत्सवाचे आयोजन केल्यास त्याला आमचा विरोध नाही; मात्र लोकांनी विरोध केल्यास मी लोकांसमवेत असेन. पंचायतीकडे ‘सनबर्न’ला विरोध दर्शवणारे एकही पत्र अजून आलेले नाही आणि असे पत्र आल्यास त्यावर पंचायत मंडळ विचार करेल.’’ ‘सनबर्न’च्या आयोजकांनी २८ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत पेडणे येथे मोपा विमानतळ परिसरात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आहे.

नागरिकांचा विरोध होऊ नये; म्हणून महोत्सवाला शेवटच्या क्षणी अनुज्ञप्ती दिली जाते ! – नागरिकांच्या प्रतिक्रिया

गेली कित्येक वर्षे ‘सनबर्न’ महोत्सव डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गोव्यातील हणजूण आदी समुद्रकिनार्‍यांवर होत असतो. महोत्सवाला प्रारंभी सरकारकडून विरोध होत असतो आणि महोत्सव जवळ आल्यावर शेवटच्या क्षणी त्याला सरकारकडून अनुज्ञप्ती मिळत असते. गेली कित्येक वर्षे हा प्रकार नागरिक अनुभवत आहेत. नागरिकांचा विरोध होऊ नये; म्हणून महोत्सवाला शेवटच्या क्षणी अनुज्ञप्ती दिली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

‘सनबर्न’ महोत्सवासाठी ‘बूक माय शो’ संकेतस्थळावर तिकीटविक्री चालू

गोव्यात डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवासाठी ‘बूक माय शो’ संकेतस्थळावर तिकीटविक्री चालू झाली आहे. विशेष म्हणजे महोत्सवाच्या आयोजनाला सरकारकडून अनुज्ञप्ती मिळालेली नसतांना तिकीटविक्रीला प्रारंभ झाला आहे.