अवैधरित्या उत्खनन केलेल्या वाळूने भरलेली होडी महसूल विभागाच्या पथकाने कर्ली नदीत बुडवली !

प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी पकडून दिली होडी  !

मालवण – तालुक्यातील बागवाडी, काळसे येथे कर्ली नदीच्या पात्रातून अवैधरित्या उत्खनन केलेल्या वाळूने भरलेली होडी येथील ग्रामस्थांनी पकडून महसूल विभागाच्या पथकाच्या कह्यात दिली. त्यानंतर पथकाने नदीच्या पात्रात मध्यभागी नेऊन ती होडी बुडवली.

बागवाडी येथे कर्ली नदीच्या पात्रात वाळू उत्खननास प्रतिबंध असतांनाही मोठ्या प्रमाणात वाळूचे अवैधरित्या उत्खनन चालू आहे. हे प्रकार थांबवावेत, यासाठी सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २७ ऑगस्ट या दिवशी अवैधपणे वाळूचे उत्खनन चालू असलेल्या ठिकाणी होडीने जाऊन धाड टाकली. या वेळी एक होडी आणि त्यावरील काही परप्रांतीय कामगार पकडले. अन्य १२ परप्रांतीय कामगारांनी नदीत उड्या टाकून पलायन केले. ग्रामस्थांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून पकडलेली होडी त्यांच्या कह्यात दिली.

न्यायालयाचा आदेश धुडकावून प्रतिबंधित क्षेत्रात वाळू उत्खनन करणार्‍या सर्व होड्या, त्यावर काम करणारे परप्रांतीय कामगार, पसार झालेले कामगार, वाळूची वाहतूक करणारी वाहने, बागवाडीमध्ये अनधिकृतरित्या रहाणारे परप्रांतीय कामगार, या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली.

संपादकीय भूमिका 

जे काम प्रशासनाने केले पाहिजे, ते जनतेला करावे लागत असेल, तर प्रशासनाचा खर्चिक डोलारा हवाच कशाला ?