मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांचा सगळीकडे प्रसार व्हावा, या हेतूने लालबाग येथील ‘राजे फाऊंडेशन’ (महाराष्ट्र राज्य) ही संस्था गेल्या दशकापासून मुंबई, तसेच महाराष्ट्रात कार्यरत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गडदुर्ग महाराष्ट्राचे वैभव असून इतिहासाची जपणूक व्हावी’, हा विचार समोर ठेवून संस्थेने गड संवर्धन आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत संस्थेच्या शिलेदारांनी रायगड जिल्ह्यातील सरसगडावर संवर्धन आणि वृक्षारोपण यांचे कार्य नुकतेच हाती घेतले होते.
१. शिलेदारांनी पायवाट, तसेच ९६ पायर्या आणि महादरवाजा स्वच्छ करून तेथील कचराही गोळा केला. गडाच्या परिसरात पायथ्यापासून ते बुरुजापर्यंत ५० झाडे लावण्यात आली. त्यात प्रामुख्याने फळझाडे, फुलझाडे, वटवृक्ष आणि औषधी वनस्पती यांचा समावेश होता.
२. बुरुजावरती वाढलेले गवत, तसेच साचलेले शेवाळ काढण्यात आले, शिवकालीन काळात पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेली वाट पाऊस, दगड आणि माती यांमुळे बुजली होती. तीही खुली करण्यात आली. तलावांची स्वच्छता करण्यात आली. गडाच्या परिसरातील पाण्याचे ६-७ कुंड स्वच्छ करण्यात आले.
३. या मोहिमेत मुंबई आणि पुणे येथून आलेले पुष्कळ शिलेदार उपस्थित होते. त्यात संस्थेचे अध्यक्ष सिद्धांत पिसाळ, उपाध्यक्ष योषित नागावकर आणि मयुरेश पाटील, सचिव रोहित पिसाळ, खजिनदार पंकज कोल्हे, उपखजिनदार अमित जाधव आणि ऋषिकेश आचारी, तसेच कल्पेश आचारी, संतोष पवार आणि अशोक कुडले या कार्यकारिणी सदस्यांसह अन्य पदाधिकार्यांचा समावेश होता.
पुढील पिढीला शिवरायांचा तेजस्वी इतिहास समजण्यासाठी संस्था कार्यरत !
‘राजे फाऊंडेशन’ महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना वर्ष २०१२ मध्ये झाली असून वर्ष २०१६ पासून गडदुर्ग स्वच्छता मोहीम आखायला संस्थेने प्रारंभ केला. या संस्थेने आतापर्यंत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शिवजन्मोत्सव सोहळा, शिववक्तृत्व स्पर्धा असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले असून पुढील पिढीला शिवरायांचा तेजस्वी इतिहास समजावा, या हेतूने आमची संस्था कार्यरत आहे. वर्ष २०२२ मध्येही आम्ही रायगड आणि पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या समाधीजवळ वृक्षारोपण केले होते.
– श्री. रोहित पिसाळ, सचिव, ‘राजे फाऊंडेशन’, महाराष्ट्र राज्य स्वच्छता सेवेनंतर एकत्र जमलेले शिलेदार