पेडणे, २६ ऑगस्ट (वार्ता.) – पेडणे येथील मोपा विमानतळ (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) परिसरात होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ महोत्सवाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला आाहे. स्थानिकांनी विरोध दर्शवणारे निवेदन स्थानिक पंचायतीच्या सरपंचांना दिले आहे.
Aamka naka Sunburn! Pernem locals oppose for Proposed Sunburn Festival at Manohar International Airport, Mopa
WATCH : https://t.co/TVnNIf2VtR#Goa #GoaNews #oppose #sunburn #Pernem #locals pic.twitter.com/7fCRWayjt4— In Goa 24×7 (@InGoa24x7) August 26, 2023
‘सनबर्न’च्या आयोजकांनी गोव्यात २८ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन केल्याचे घोषित केले आहे. प्रतिवर्षी ‘सनबर्न’ महोत्सव बहुतांश वेळा हणजूण समुद्रकिनार्यावर होत असतो. यंदा हा महोत्सव मोपा विमानतळ परिसरात घेण्याचा प्रस्ताव ‘सनबर्न’च्या आयोजकांनी सरकारसमोर ठेवला आहे. सरकार या प्रस्तावाला संमती देण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर पेडणेवासियांनी हा विरोध दर्शवला आहे.
नागरिकांनी सरपंचांना दिलेल्या निवेदनात पुढील सूत्रे मांडली आहेत.
१. सरकारने मोपा विमानतळ परिसरात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्यास अनुमती देऊ नये.
२. ‘सनबर्न’ महोत्सव यापूर्वी गोव्यात ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणच्या लोकांसाठी हा महोत्सव सर्वच स्तरांवर उपद्रवी ठरला आहे. महोत्सवात अमली पदार्थ, मद्य आणि इतर अनधिकृत कृत्ये करण्यात आलेली आहेत.
३. पेडणे येथील परिसर शांत आहे आणि येथील युवावर्ग अनधिकृत कृत्यांपासून दूर आहे. पंचायतीने या महोत्सवाला विरोध दर्शवावा.
(म्हणे) ‘सनबर्न’च्या आयोजनामध्ये सरकारने भागीदार व्हावे !’ – भाजपचे आमदार मायकल लोबो
म्हापसा मी इंग्लंडमध्ये गेलो होतो. तेथे ‘सनबर्न’सारख्या महोत्सवाचे आयोजन तेथील सरकारच्या भागीदाराने झाले. तेथील सरकारने आयोजकांकडून शुल्क घेतले आणि वस्तू अन् सेवा करही (जी.एस्.टी.) आकारला. तेथील सरकार कार्यक्रमातील एक भागीदार असल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारते. येथील सरकार याचे अनुकरण का करत नाही ? सनबर्न महोत्सव पर्यटन खात्याला २ कोटी रुपये शुल्क देते, तर मग सरकार ‘सनबर्न’चा भागीदार होण्याचा विचार का करत नाही ? प्रत्येक खात्याने आयोजकांना निरनिराळे शुल्क आकारल्यास अप्रत्यक्षपणे सरकार ‘सनबर्न’चा भागीदार होईल. यापूर्वी ‘सनबर्न’ महोत्सव हा हणजूण, वागातोर, शापोरा आदी ठिकाणी समुद्रकिनार्याच्या जवळ झालेला आहे. मोपा येथे ‘सनबर्न’च्या आयोजनासाठी ‘गेस्ट हाऊस’, ‘हॉटेल्स’, उपाहारगृहे आदी आवश्यक साधनसुविधा उपलब्ध नाहीत. पुणे येथे ‘सनबर्न’चे आयोजन केल्याने आयोजकांची आर्थिक हानी झाली होती.
अनुज्ञप्ती मिळण्यापूर्वीच आयोजकांकडून महोत्सवाचा सामाजिक माध्यमांतून प्रसार !
‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजक महोत्सवाला अनुज्ञप्ती (लायसन्स) मिळण्यापूर्वीच महोत्सवाचा सामाजिक माध्यमांतून प्रसार करत आहेत; मात्र महोत्सवाच्या स्थळाचा उल्लेख आयोजकांनी अद्याप केलेला नाही.
संपादकीय भूमिका‘सनबर्न’ महोत्सवात अमली पदार्थांच्या अतीसेवनाने काही जणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त झाले आहे. या महोत्सवामुळे युवावर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे. गोवा सरकार आता आध्यात्मिक पर्यटनाला चालना देत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने युवकांना व्यसनाधीन बनवणार्या पाश्चिमात्य महोत्सवाऐवजी आध्यात्मिक पर्यटन अधिकाधिक वृद्धींगत करण्यावर भर द्यावा, असे गोमंतकियांना वाटते ! |