तथाकथित विवेकवादी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा नाहक बळी देण्याचा प्रयत्न चालू !

वर्ष २०१३ मध्ये तथाकथित विवेकवादी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यानंतर सनातन संस्थेवर आरोप करण्यात आले. या प्रकरणी आजही माध्यमांमध्ये एकांगी बाजू मांडली जात आहे; पण नाण्याची दुसरी बाजूही समोर येणे आवश्यक आहे. या अन्वेषणात अनेक संभ्रम निर्माण करणारे दावे करण्यात आले आहेत. ‘हे अन्वेषण भरकटले आहे का ?’, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे; पण हे वास्तव कुठलेही प्रसिद्धीमाध्यम मांडतांना दिसत नाही. यासंदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे यांनी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांच्याशी संवाद साधला. यातून डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्ष प्रचार आणि वास्तव समजून घेऊया.     

(भाग १)

१. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये धर्मनिरपेक्ष शक्तींकडून सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न !

देशात राजकीय विचारांनी प्रेरित असलेल्या धर्मनिरपेक्षतावादी आणि डाव्या शक्ती आहेत. त्यांचा नेहमी राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी ‘अजेंडा बेस्ड प्रपोगंडा’, म्हणजे ध्येयप्रेरित प्रचार असतो. हे काँग्रेस आणि कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्ष यांनी नेहमीच केलेले आहे. या राजकीय शक्ती त्यांच्या ध्येयाला अनुरूप ‘अजेंडा’ (कार्यसूची) सिद्ध करतात आणि त्याचा नंतर ‘प्रपोगंडा’ (प्रचार) करतात. ‘भगवा आतंकवाद’ हे नाव ‘अजेंडा बेस्ड प्रपोगंडा’चे (कार्यसूचीनुसार ठरवून केलेला प्रचार) एक उत्तम उदाहरण आहे. देशात जिहादी आतंकवाद असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तेव्हा तत्कालीन धर्मनिरपेक्ष शासनकर्त्यांनी अल्पसंख्यांकांची मतपेढी वाचवण्यासाठी ‘भगवा आतंकवाद’आहे, हे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आजही ‘गांधी हत्येनंतर जणू डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्याच हत्या झाल्या अन् या हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केल्या असून धर्मनिरपेक्षतेला मोठा धोका निर्माण झाला आहे’, असे वातावण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यामागे या हत्यांविषयी चर्चा चालू ठेवायची आणि दुसरीकडे जिहाद्यांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्यांवर पांघरूण घालायचे, हे षड्यंत्र आहे. पूर्वीच्या काळी काहीही घडले की, हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दोषी ठरवणे, हा त्यांचा ‘मेगाप्लॅन’ (सुनियोजित कट) असायचा. पूर्वी ते भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांवर आरोप करायचे. आता भाजप सत्तेत आहे. त्यामुळे आता त्यांना तुलनेत लहान असलेली आणि कुठलेही राजकीय पाठबळ नसलेली सनातन संस्था एक ‘सॉफ्ट टार्गेट’ (सोपे लक्ष्य) म्हणून मिळाली आहे. त्यानुसार तिला दोषी ठरवले जात आहे.

श्री. चेतन राजहंस

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी ७.३० वाजता डॉ. दाभोलकारांची हत्या झाली. त्यानंतर काही मिनिटांतच दूरचित्रवाहिनीवर कम्युनिस्ट विचारसरणीच्या पत्रकारांनी, ‘ही हत्या डॉ. दाभोलकरांची वैचारिक विरोधक असलेल्या सनातन संस्थेनेच केली’, असे सांगणे चालू केले. त्या वेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसलाही ही भूमिका अनुकूल वाटली; कारण त्यांना ‘भगवा आतंकवाद‘ हा ‘अजेंडा बेेस्ड प्रपोगंडा’ पूर्ण करायचा होता. त्यामुळे हत्येच्या एक घंट्याच्या आतच काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘ज्या विचारांनी म. गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी डॉ. दाभोलकरांची हत्या केली. तसेच ही हत्या राजकीय असून ती नथुरामी प्रवृत्तींनी केली !’ त्या वेळी कुठलेही अन्वेषण झाले नसतांना एका मुख्यमंत्र्यांनी असे दायित्वशून्यतेचे वक्तव्य करणे भयंकर होते. याचा अर्थ एकतर त्यांना याची आधीच माहिती होती किंवा घंट्याभरातच त्यांचे अन्वेषण पूर्ण झाले होते. यातून अन्वेषण यंत्रणांनी त्यांचे अन्वेषण कुठल्या दिशेने करायचे आहे, याचा मुख्यमंत्रीपदी बसलेल्या व्यक्तीने सूचक इशाराच दिला होता. दुर्दैवाने त्या वेळच्या अन्वेषण यंत्रणांनी या इशार्‍यानुसार हिंदुत्वनिष्ठ संघटनांना या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (दिवंगत) नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री रा.रा. पाटील होते.

भगवा आतंकवादाच्या कथानकामध्ये वर्ष २००८ चे मालेगाव प्रकरण जोडण्यात आले होते. तेव्हा साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना अटक करण्याचे काम रा.रा. पाटील यांनी केले होते. आताही तेच गृहमंत्री होते. त्यामुळे ही एक संगनमताने घडलेली घटना आहे. त्या चौकटीमध्ये भगवा आतंकवादाचा ‘अजेंडा’ बसवण्यासाठी सनातन संस्थेला गोवण्यात आले. त्यासाठी काँग्रेसच्या, म्हणजे धर्मनिरपेक्षवादी शक्तींनी पूर्ण प्रयत्न केले, हे सांगण्याला वाव आहे.

२. अन्वेषण यंत्रणांकडून आधीच आरोपी निश्‍चित करून एकांगी अन्वेषण !

या प्रकरणाचे अन्वेषणच मुळात पूर्वग्रहकलुषित आणि राजकीय विचारांनी प्रेरित झाले आहे. डॉ. दाभोलकरांचे अनेक वैरी असल्याने अन्वेषणासाठी अनेक ‘अँगल’ (पैलू) होते. खाप पंचायतवाले आणि जातनिर्मूलन राबवणारे हेही डॉ. दाभोलकरांचे वैरी होते, तसेच काही धर्मनिष्ठ बाबा आणि बुवाबाजी करणारेही डॉ. दाभोलकरांचे विरोधक होते. यासमवेतच त्यांच्या न्यासामध्ये घोटाळे उघड झाल्यामुळे काही लोकांची राजकीय अप्रतिष्ठा झाली होती. तेही आरोपीच्या पिंजर्‍यात येऊ शकले असते. अशा प्रकारे आरोपीच्या पिंजर्‍यात येणारी बरीच मंडळी असतांना आणि डॉ. दाभोलकरांचे नक्षलवाद्यांशी संबंध असतांना अन्वेषण यंत्रणांनी या दिशेने चौकशी केलीच नाही. याउलट सनातन हिंदु धर्माचा प्रचार करणारी, लोकांना अध्यात्म सांगणारी, लोकांना व्यसनमुक्त बनवणार्‍या सामाजिक संस्थेला आरोपी बनवण्याचा दुर्दैवी प्रयत्न झाला.

आज आम्ही महाराष्ट्रात सनातन धर्माचा प्रचार करत असतांना या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचे धंदे बंद होत होते. त्यांच्या कार्यक्रमाला १०-२० लोकांहून अधिक लोक उपस्थित नसायचे. त्यामुळे आम्हाला त्यांचे वैचारिक विरोधक ठरवण्यात आले. पुढे जाऊन आम्हाला त्यांच्या हत्येचे आरोपी ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे हे अन्वेषण पूर्णत: एकांगी होते. राजकीय दृष्टीकोनातून काँग्रेस आणि त्या वेळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सामाजिक संस्था विशेषत: अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संस्थांनी असा प्रचार केला, ‘सनातन संस्थेनेच हत्या केलेली आहे.’ त्यांच्या अपप्रचाराला फसून त्या वेळच्या अन्वेषण यंत्रणांनी आम्हाला दोषी ठरवण्याचा प्रयत्न  केला.

३. अन्वेषण यंत्रणांचे सनातन संस्थेच्या विरोधातील भरकटलेले अन्वेषण !

अ. या हत्येप्रकरणी जेव्हा आरोपी सापडत नव्हते, तेव्हा केवळ सनातन संस्थेवर लक्ष ठेवून अन्वेषण करण्यात आले. सनातन संस्थेच्या २ साधकांची नावे घेण्यात आली. त्याचे त्यांनी साक्षीदारही उभे केले; पण नंतर आरोपी पालटले. २० ऑगस्ट या दिवशी हत्या झाल्यानंतर २८ ऑगस्ट या दिवशी अन्वेषण यंत्रणेने गोव्यातील सनातनच्या आश्रमातून एका साधकाला कह्यात घेतले. त्यानंतर त्याला पुणे येथे नेण्यात आले. त्याची तब्बल ५ घंटे चौकशी केली आणि काहीही निष्पन्न झाले नाही; म्हणून शेवटी त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर  माहितीच्या अधिकाराखाली अंनिसच्या ट्रस्टमधील घोटाळे बाहेर काढणार्‍या सनातनच्या आणखी एका साधकाला कह्यात घेतले. त्याने घोटाळे काढले; म्हणून तोच आरोपी आहे, असा पूर्वग्रहकलुषित दृष्टीकोन त्या वेळच्या अन्वेषण यंत्रणांनी करून घेतला. त्यातही काही साध्य झाले नाही; म्हणून त्यालाही सोडून देण्यात आले. त्याही पुढे जाऊन ७०० साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. त्या थेट आणि छुप्या पद्धतीने करण्यात आल्या. पोलिसांनी तेव्हा साधक महिलांचीही छायाचित्रे काढली.

आ. एक दिवस सनातनच्या पनवेलच्या आश्रमामध्ये पोलिसांचे पथक आले. त्यांना आश्रमाच्या कार्यपद्धतीप्रमाणे ओळखपत्र विचारले. तेव्हा त्या पोलीस अधिकार्‍यांनी बंदूक काढून साधकाला धमकावण्याचा प्रयत्न केला. आश्रमातील व्यक्ती बंदूक दाखवूनही शरण येत नाही, हे पाहिल्यावर ते स्वत:च घाबरले आणि अडचण येऊ नये; म्हणून पळ काढला. त्यांच्या वाहनाच्या क्रमांकाचा शोध घेतला, तेव्हा मालेगाव प्रकरणातील साक्षीदार दिलीप पाटीदार यांची हत्या केल्याचा ज्या पोलीस अधिकार्‍यावर आरोप होता, त्या राजन घुलेची ही गाडी असल्याचे लक्षात आले.

नंतर पुष्कळ दिवसांनी स्पष्ट झाले की, ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक सनातनचे श्री. विक्रम भावे यांना अटक करण्यासाठी हे लोक आले होते. त्यांना श्री. विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे आरोप ठेवायचे होते आणि अन्वेषण पूर्ण झाले आहे, हे दाखवायचे होते. त्यासाठी हा कट रचला होता. सुदैवाने त्यांचा हा कट उघडकीस आला.

इ. डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी २० जानेवारी २०१४ मध्ये शस्त्रतस्कर तथा कुख्यात गुंड विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी यांना अटक झाली. त्यांच्याकडून बंदूक कह्यात घेण्यात आली. त्याचा ‘बॅलेस्टिक रिपोर्ट’ ही खरा आला; दाभोलकर कुटुंब सांगत होते, ‘हे ते आरोपी नाहीत, तर सनातनचे साधक आरोपी आहेत.’ त्यामुळे त्या दोघांनाही जामीन देण्यात आला.

ई. अन्वेषण यंत्रणांना काहीही करून काहीच सापडत नव्हते. तेव्हा त्यांनी मडगाव प्रकरणातील पसार असलेल्या सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना दाभोलकर प्रकरणात आरोपी बनवले. त्यासाठी त्यांचे रेखाचित्र काढले आणि एका साक्षीदारानेही ते मान्य केले. त्यासाठी सनातनच्या आश्रमातील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना सूत्रधार संबोधले. ते आश्रमात येऊन वैद्यकीय सेवा पुरवायचे.

उ. त्याही पुढे जाऊन वर्ष २०१८ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने संभाजीनगरच्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना अटक केली अन् ‘हेच दोघे आरोपी आहेत’, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

गंमत अशी की, डॉ. दाभोलकरांची २ व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. आरोपपत्रात खंडेलवाल आणि नागोरी यांच्याकडून बंदूक कह्यात घेतली आहे. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना आरोपी घोषित करून त्यांचे सूत्रधार डॉ. तावडे यांना ठरवले. त्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर ही नावे घेण्यात आली. अशा प्रकारे हा बनाव चालू आहे. या प्रकरणातील आरोपपत्रातीलही नवनवीन आवृत्त्या आल्या आहेत. आतापर्यंत ३ पुरवणी आरोपपत्रे लागलेली आहेत. ती नाकारण्याच्या ऐवजी न्यायालयात तिन्हीवरही चर्चा चालू आहे. एवढे भीषण वास्तव असतांनाही त्याविषयी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांमध्ये चर्चाही होतांना दिसत नाही. प्रत्येक वेळी सनातनचे आरोपी कसे आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.

(क्रमश: पुढच्या रविवारी)

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था