सातारा, २६ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्ह्यातील फलटण येथील पशूवधगृहाच्या माध्यमातून भारतातील आतंकवाद्यांना वित्तपुरवठा केला जातो. नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्राचे पशूधन संपवणारे हे पशूवधगृह तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी ‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले, ‘‘फलटण येथे २ दिवसांपूर्वी गोरक्षक सौरभ सोनवणे आणि अक्षय तावरे यांच्या सहकार्याने १० म्हशींची सुटका करण्यात आली, तसेच गोशाळेमध्ये त्यांची पाठवणी करण्यात आली. १० म्हशींपैकी ४ म्हशी दूध देणार्या होत्या. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला; मात्र भारतीय प्राणी संवर्धन कायदा २०१५ हा महाराष्ट्रात लागू होऊनही या कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नाही. फलटण येथील पशूवधगृहाला राजकीय पाठबळ आहे. या पशूवधगृहामधून देशी, खिलारी जातीच्या गायी आणि म्हशी यांची हत्या चालू आहे. हे पशूवधगृह तात्काळ बंद करावे. सध्या भारतामध्ये १४ कोटी लिटर दूध उत्पादन होते; मात्र ६४ कोटी लिटर दूध विकले जाते. हे गंभीर आहे. दुधाची भेसळ, तसेच लोकांचे आरोग्य याविषयी अन्न आणि औषध प्रशासनही गंभीर नाही. गोधनाचे रक्षण करण्यासाठी पोलीसही बघ्याची भूमिका घेतात. यामुळे गोरक्षकांना पुढे यावे लागत आहे. पशूसंवर्धन समिती ही जिल्हास्तरावर कार्यान्वित करायची असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी याविषयी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. स्वतंत्र ‘टास्क फोर्स’ नेमून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये आर्थिक प्रावधान करण्याचा नियम आहे; मात्र महाराष्ट्रात कुठेही हा कायदा प्रभावीपणे राबवला जात नाही.’’