पुणे येथे रेल्वे पोलीस अधिकार्‍याच्या आडमुठेपणामुळे वैद्यकीय कक्षाची जागा पालटण्याचा खटाटोप !

रेल्वे अधिकारी वरिष्ठांना जुमानत नसल्याचे उघडकीस !

पुणे – प्रवाशांसाठी पुणे रेल्वेस्थानकाच्या आवारात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. या कक्षाचे कंत्राटही ‘रुबी हॉल रुग्णालया’ला देण्यात आले. नुकतेच ‘रुबी हॉल’चे पथक पहाणीसाठी स्थानकावर आले. त्या वेळी रेल्वे पोलीस दलाच्या (आर्.पी.एफ्.) कर्मचार्‍यांनी त्यांना पिटाळून लावले. त्या वेळी वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी उदयसिंह पवार यांनी हा विरोध केल्याचे समोर आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी निर्णय घेतलेला असतांनाही हा विरोध करण्यात आला. पवार यांच्या आडमुठेपणामुळे या कक्षाची जागा पालटण्याचा खटाटोप रेल्वेने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यवाही केली जात आहे. यावर ‘रेल्वेकडून झालेले सर्वेक्षण ही अंतर्गत गोष्ट आहे. याविषयी वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील’, असे म्हणून उदयसिंह पवार यांनी स्पष्टीकरण देण्याचे टाळले आहे.

रेल्वेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, पवार यांच्यावर कारवाई करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने पुन्हा जागेसाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि उदयसिंह पवार यांनी स्थानकात जाऊन पहाणी केली. रेल्वे पोलीस दलाच्या पोलीस ठाण्यासमोरील वाहनतळाच्या जागी हा कक्ष उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याजागी आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यास पवार यांनी पहाणीच्या वेळीही विरोध केला. त्याऐवजी पार्सल कार्यालयाकडील एका कोपर्‍यातील जागा त्यांनी सुचवली. त्याला ‘रुबी हॉल रुग्णालया’ने नकार दर्शवल्याने ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे.

‘रुबी हॉल रुग्णालया’ची भूमिका !

रेल्वे पोलीस दलाने सुचवलेली जागा एका बाजूला असून प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर नाही. त्यामुळे ती योग्य नसल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे. रेल्वेतील इतर अधिकार्‍यांनी या प्रकारावर खेद व्यक्त केला आहे. वरिष्ठांनी दिलेला आदेश न पाळणार्‍या अधिकार्‍याची मनमानी प्रशासन खपवून घेत आहे, असा आक्षेपही अनेक अधिकार्‍यांनी नोंदवला आहे.