गोवंशियांची वाहतूक न करण्याचा आदेश
सोलापूर – राज्यामध्ये गोवंशियांचा लंपी आजार पुन्हा डोके वर काढत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व गोवंशियांचा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासमवेतच गोवंशियांची एकत्रित वाहतूक करण्यावरही बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. ‘जिल्ह्यातील पशूपालकांनी गोठ्याची स्वच्छता ठेवावी, आवश्यक त्या औषधांच्या फवारण्या कराव्यात’, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात पशूसंवर्धन विभागाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला पशूसंवर्धन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपायुक्त डॉ. समीर बोरकर, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांच्यासह ११ तालुक्यातील पशूधन विकास अधिकारी यांची उपस्थिती होती. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर या भागांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येतो. सोलापूर जिल्ह्यात या आजारामुळे होणार्या गोवंशियांचा मृत्यू दरही अधिक असल्याने दक्षता म्हणून जिल्ह्यातील सर्व गोवंशियांचा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.