नोंदणीकृत ग्रह प्रकल्पांमधूनच ग्राहकांनी सदनिका खरेदी करावी ! – प्रमोद खैरनार

सातारा, २४ ऑगस्ट (वार्ता.) – गृह बांधणी आणि गृह खरेदी यांच्या व्यवहारात पारदर्शकता आणणार्‍या ‘रेरा’ कायद्याने ग्राहकांचे हित जपले गेले आहे. ग्राहक आणि विकसक यांच्यातील संबंधांमध्ये या कायद्याने सुलभता आली असून हा कायदा विकसकांना मार्गदर्शक ठरत आहे. नोंदणीकृत असणार्‍या गृहप्रकल्पामधूनच नागरिकांनी सदनिका खरेदी करावी, असे आवाहन ‘क्रेडाई संघटने’चे महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी पत्रकार परिषदेत केले. क्रेडाईच्या सातारा येथील विभागाच्या वतीने सातार्‍यात ए टू झेड रेरा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेत शहरातील १७५ विकसकांनी सहभाग घेतला.

रेरा कायद्याविषयी माहिती देतांना सुनील कोतवाल म्हणाले, ‘‘रेरा कायद्यांमध्ये विकसक आणि ग्राहक यांच्या हिताच्या सुलभीकरणाचा विचार करण्यात आला आहे.  ‘क्रेडाई संघटना’ सुरुवातीला राज्य पातळीवर काम करत होती. आता सातारा जिल्ह्यात त्याचे सातारा, कराड आणि फलटण असे ३ विभाग चालू आहेत. येथे विकसकांनी काम करतांना स्थानिक परिसराच्या विकासाचा तसेच पायाभूत सुविधांचा आणि व्यावसायिक बांधिलकीचा परिपूर्णतेने विचार करणे आवश्यक आहे. रेरा कायद्याने विकसकांना नियमाप्रमाणे वागण्याचे बंधन आले आहे. ग्राहकांनी नेहमी रेरा कायद्याप्रमाणे नोंदणी असणार्‍या गृहप्रकल्पातून गृह खरेदी करावी. यामध्ये क्यू.आर्. कोड देण्यात आला आहे. रेरा कायद्याने नोंदणी झालेल्या गृहप्रकल्पाचे अद्ययावतीकरण, तसेच दर ३ मासांनी गृहप्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने दिला जाणारा आढावा विकसकांना ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार या कायद्याने नियंत्रणात आले आहेत.’’