दुधात भेसळ केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होणार !

तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर मराठवाड्यात धडक मोहीम !  

दुधातील भेसळ

छत्रपती संभाजीनगर – दुधात होणार्‍या भेसळीविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हावार धडक मोहीम राबवण्याचे निर्देश दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी २४ ऑगस्ट या दिवशी दिले आहेत. त्यानुसार मराठवाडा विभागातील सर्व ८ जिल्ह्यांत दूध पडताळणीची धडक मोहीम चालू करण्यात आली आहे, तसेच दुधात भेसळ करणार्‍यांच्या विरोधात दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईही केली जात आहे. त्यामुळे सर्व दूध विक्रेते, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, उत्पादक यांनी उच्च गुणप्रतीच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील दूध भेसळ रोखण्याच्या अनुषंगाने २८ जून या दिवशी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार दुधात होणार्‍या भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी असतात, तर अपर पोलीस अधीक्षक, साहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक वैध मापनशास्त्र यांची सदस्य, तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार आता धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

१८ ऑगस्ट या दिवशी दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी दूध भेसळीविरुद्ध धडक मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले.

संपादकीय भूमिका

जनतेला धर्मशिक्षण दिल्यास दुधात भेसळ करण्याचे विचार त्यांच्या मनात येणार नाहीत, याकडेही लक्ष द्यायला हवे !