अभाविप सांगली जिल्ह्यात २० सहस्र नवीन उद्योजक सिद्ध करणार !

अभाविपच्या उद्योजकता विकास यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवर आणि कार्यकर्ते

सांगली – महाविद्यालयीन युवकांना उद्योजकतेची माहिती व्हावी आणि स्वयंरोजगारविषयक शासकीय योजना कळाव्यात, यासाठी २१ ते २९ ऑगस्ट या कालावधीत ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने जिल्हास्तरीय ‘उद्योजकता विकास यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या उद्योजकता विकास यात्रेचा प्रारंभ डॉ. रविकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सांगली मधील उद्योजक माधव कुलकर्णी यांनी विद्यार्थांना ‘उद्योजक’ या विषयावर मार्गदर्शन केले. अभाविप सांगली जिल्ह्यात २० सहस्र नवीन उद्योजक सिद्ध करेल, असा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

या यात्रेच्या कालावधीत उद्योजकता विकास रथ सांगली जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३६ महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्यान, चित्रफित, पत्रके आदींच्या माध्यमातून युवकांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रसंगी प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे, डॉ. श्वेता मेहता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नितीन देशमाने, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे बाळासाहेब गायकवाड, प्रा. जान्हवी बेडेकर, सुरज मालगावे यांसह अन्य उपस्थित होते.