पुणे – आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी बोलवलेल्या बैठकीकडे पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांनी पाठ फिरवली. त्यामुळे गोर्हे यांनी प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत आगामी गणेशोत्सवासाठीच्या उपाययोजनांच्या संदर्भात पालिका आणि जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या. या बैठकीसाठी पुणे महापालिकेचे आयुक्त, पुण्याचे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवासंदर्भात प्रतिवर्षी महापौर आणि महापालिका प्रशासन बैठक घेते; मात्र वर्षभरापासून पुणे महापालिकेवर प्रशासक नेमल्याने आणि महापौर पद रिक्त असल्याने पालिकेने यंदाही बैठक घेतलेली नव्हती. या बैठकीला गोर्हे यांनी शहरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रित केले होते.
महापौर पद रिक्त असेल, तर पालकमंत्र्यांनी गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करणे अपेक्षित आहे. त्यामुळे डॉ. गोर्हे यांनी कोणत्या अधिकारात बैठक बोलावली ? असा प्रश्न काँग्रेसचे नेते संजय बालगुडे यांनी उपस्थित केला.