पुणे – ‘अपेक्षा’ मासिकाला १५ ऑगस्ट या दिवशी २५ वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने ‘अपेक्षा’ मासिकाचा रौप्यमहोत्सवपूर्ती समारंभ नुकताच सदाशिव पेठ येथील उद्यान प्रसाद कार्यालयात पार पडला. या वेळी ह.भ.प. रंगनाथ नाईकडे (मुख्य वनसंरक्षक) यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आला आणि अधिवक्ता घनश्याम दांगट पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी मासिक परिवाराच्या वतीने मेळावा आणि नवरत्न कवीसंमेलन आणि गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. अपेक्षा मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी २५ वर्षांतील सर्व दीपावली विशेषांक आणि इतर काही अंकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी, तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सूर्यकांत वैद्य उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक श्री. बाळकृष्ण बाचल, ज्येष्ठ साहित्यिका सौ. प्रभा सोनवणे, ह.भ.प. रंगनाथ नाईकडे आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्याम भुर्के, तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी मराठी साहित्य क्षेत्र याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, तसेच श्री. महेश पाठक उपस्थित होते. श्री. पराग गोखले, श्री. महेश पाठक आणि श्री. सुनील ओजाळे यांचाही सन्मान या वेळी करण्यात आला.
‘अपेक्षा’ मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे हे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होतात. समितीच्या कार्याला त्यांचे नेहमी सहकार्य असते. त्यांच्या मासिकातून गेल्या किमान १० वर्षांपासून साधना, राष्ट्र धर्म आणि संशोधन यांविषयीचे लेख प्रसिद्ध करून समाजात या माध्यमातून जागृती करण्याचे काम करत आहेत. ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या विशेष कार्यक्रमातही ते वक्ते म्हणून सहभागी झाले होते. ‘समिती पुष्कळ मोलाचे कार्य करत आहे. साधक तळमळीने सेवा करतात याचा मला पुष्कळ आनंद होतो’, असेही त्यांनी अनौपचारिक भेटीत सांगितले.
या वेळी मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे म्हणाले की, १५ ऑगस्ट १९९८ या दिवशी अपेक्षा मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि गेल्या २५ वर्षांत अनेक अडचणींवर मात करून अपेक्षा मासिकाने आपला हा यशस्वी प्रवास करतांना ‘ज्ञान, मनोरंजन आणि समाजप्रबोधन’ हेच ३ उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही पवित्र साहित्यसेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आम्हाला अनेक दिग्गज आणि नामवंत साहित्यिकांचे साहित्य प्रसिद्ध करण्याचे भाग्य लाभले आहे, तसेच अनेक जाहिरातदार, देणगीदार, वर्गणीदार आणि हितचिंतक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
आज यामधील अनेकजण हयात नाहीत; परंतु त्यांचा आशीर्वाद आणि शुभचिंतन यांमुळे अपेक्षा मासिकाची वाटचाल अव्याहतपणे चालू आहे. आजही आपले सर्व साहित्यिक आणि अनेक प्रकारे योगदान देणारे सर्वच अपेक्षा मासिकावर भरभरून प्रेम करत आहेत. आपापल्या परीने विविध उपक्रमांत सहभागी होऊन सहकार्य करत आहेत. याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अपेक्षा मासिकाचा परिवार आपले सदैव ऋणी आहे.