आज सायंकाळी ६.०४ वाजता ‘लँडर विक्रम’ चंद्रावर उतरणार !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताच्या ‘चंद्रयान-३’चे ‘लँडर विक्रम’, आज २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६.०४ वाजता चंद्रावर उतरणार आहे. सायंकाळी ५.४७ वाजल्यापासून त्याची चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया चालू होणार आहे. या संपूर्ण कालावधीला ‘फिफ्टीन मिनिट्स ऑफ टेरर’(दहशतीची १५ मिनिटे) असे म्हणतात. जर लँडर चंद्रावर उतरण्यास यशस्वी ठरला, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरेल.

चंद्रावर उतरण्याच्या २ घंटे आधी लँडर विक्रमची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थिती यांचा अभ्यास करून चंद्रावर उतरणे योग्य आहे कि नाही, हे ठरवण्यात येणार आहे. जर या वेळी काही समस्या असेल, तर २७ ऑगस्ट या दिवशी लँडर विक्रम चंद्रावर उतरवण्यात येईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

लँडर विक्रम चंद्रावर उतरल्यानंतर काय होईल ?

लँडर विक्रम चंद्रावर सुखरूप उतरल्यानंतर थोड्या वेळाने त्यामधून ‘रोव्हर प्रज्ञान’ बाहेर येईल. हे दोघे मिळून चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढतील. नियंत्रण कक्षातून आदेश मिळाल्यानंतर रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल. या काळात त्याची चाके चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील. पुढील १४ दिवस विक्रम आणि प्रज्ञान चंद्राची माहिती पाठवतील.

Chandrayaan-3 Mission Soft-landing LIVE Telecast