नवी मुंबई, २२ ऑगस्ट (वार्ता.) – महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मागील मासापासून चालू केलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. १८३ पैकी १७८ शिक्षकांची भरती करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट यांनी दिली. तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
१. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ५३ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळांसाठी तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नियुक्ती करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला होता.
२. प्राथमिक विभागासाठी १२३ शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. माध्यमिक विभागासाठी ६० शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी १० जुलै या दिवशी इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्रे घेण्यात आली. त्यानंतर त्यांची छाननी करून गुणक्रमानुसार (मेरीट) निवड आणि प्रतीक्षासूची प्रसिद्ध करण्यात आली.
३. प्राथमिक शिक्षक पदासाठी ५८० अर्ज प्राप्त झाले, तर माध्यमिक शिक्षक पदासाठी ५३३ अर्ज प्राप्त झाले. १३ जुलैला प्राथमिक, तर १५ जुलैला माध्यमिक शिक्षकांची निवड आणि प्रतीक्षासूची प्रसिद्ध केली होती. त्यानुसार नियुक्तीपत्र घेऊन ५ दिवसांत शाळेत उपस्थित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
४. मागील मासात शिक्षक भरतीमध्ये निवड होऊनही जे शिक्षक नियुक्ती पत्र घेण्यासाठी आले नाहीत, अशा शिक्षकांना शेवटची संधी म्हणून एक नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला.