श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनसाठी पुणे महानगरपालिका बांधणार ४५५ कृत्रिम हौद !

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद

पुणे – यंदा नैसर्गिक प्रवाहात श्रीगणेशमूर्ती विसर्जनावर बंदी असल्याने महानगरपालिकेकडून शहराच्या विविध भागांत अनुमाने ४५५ कृत्रिम हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विसर्जनासाठी हौद, निर्माल्य संकलन केंद्रे आणि मूर्तीदान केंद्रे यांची माहिती सादर करण्याची सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिली आहे.

नागरिकांकडून नदी, नाले, कालवे, विहिरी यांसह इतर नैसर्गिक जलस्रोत असलेल्या ठिकाणी श्रीगणेशमूर्तीं विसर्जित करून हे ठिकाण ‘प्रदूषित’ करू नये, यासाठी महापालिकेकडून ‘काळजी’ घेतली जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांना मूर्ती संकलन केंद्र, तसेच कृत्रिम विसर्जन हौद यांची संख्या वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाने माहिती मागवली आहे.

संपादकीय भूमिका

  • कृत्रिम हौद, मूर्ती संकलन, मूर्तीदान यांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा महानगरपालिकेने भक्तांना श्रीगणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास श्रीगणेशाची होणारी विटंबना रोखता येईल !
  • ‘गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण’ असे गृहीत धरूनच श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी अशास्त्रीय असे ‘कृत्रिम हौद’ बांधले जातात. या हौदांत मूर्तीविसर्जन करण्याचे आवाहन केले जाते. ‘पाण्यात मूर्ती विसर्जित केल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही’, हे वैज्ञानिक प्रयोगांतून अनेकदा सिद्ध करण्यात आले आहे. ‘वहात्या पाण्यात श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करावे’, असे ‘पूजासमुच्चय’ या ग्रंथात म्हटले आहे. याकडे महानगरपालिका कानाडोळा का करते ?
  • प्रदूषणाच्या नावाखाली ‘निधर्मी’ महानगरपालिका अशी ढवळाढवळ कधी इस्लाम, ख्रिस्ती आदी धर्मांत करते का ?