हा तर गुरुजन आणि शाळा यांच्‍या प्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्न ! – शशिकांत केळकर

सनातनचे साधक श्री. शशिकांत अनंत केळकर (उजवीकडे) यांचा सत्‍कार करतांना ‘जनता शिक्षण प्रसारक मंडळा’चे अध्‍यक्ष सुनील दळवी

चिपळूण, २० ऑगस्‍ट (वार्ता.) – ज्‍या शाळेच्‍या माध्‍यमातून मी ज्ञानार्जन केले. शाळेतील शिक्षणामुळे माझ्‍यावर चांगले संस्‍कार झाले. समाजात मी स्‍वाभीमानाने जगू शकलो. त्‍या शाळेच्‍या ऋणातून उतराई होण्‍यासाठी मी अल्‍पसा प्रयत्न केला आहे. हा तर माझ्‍या गुरुजनांप्रती आणि शाळेप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा अल्‍पसा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील ‘जनता माध्‍यमिक विद्यालया’चे माजी विद्यार्थी आणि सनातनचे साधक श्री. शशिकांत केळकर यांनी केले.

कोकरे येथील ‘जनता शिक्षण प्रसारक मंडळा’च्‍या ‘जनता माध्‍यमिक विद्यालया’च्‍या वतीने १५ ऑगस्‍टनिमित्त ध्‍वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष सुनील दळवी, शाळेचे माजी विद्यार्थी आणि सनातनचे साधक शशिकांत अनंत केळकर, नुकतेच सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षा उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी अविनाश चौधरी उपस्‍थित होते.

शाळेचे माजी विद्यार्थी आणि सनातनचे साधक श्री. शशिकांत केळकर यांनी त्‍यांच्‍या मातोश्री स्‍व. स्नेहलता अनंत केळकर यांच्‍या स्‍मरणार्थ शाळेप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी अध्‍यक्ष सुनील दळवी यांच्‍याकडे ५१ सहस्र रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. याप्रसंगी अध्‍यक्ष सुनील दळवी यांच्‍या हस्‍ते शशिकांत केळकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्‍पगुच्‍छ देऊन सत्‍कार करण्‍यात आला.