नवी मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील एक श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते; मात्र प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी ५० सहस्र विद्यार्थ्यांना वह्या, गणवेश आदी शालेय साहित्याविना शाळांमधून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळेच गणवेशाविना झेंडावंदन करण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढवली आहे.
या विद्यार्थ्यांना शिकवणार्या शिक्षकांनासुद्धा गलेलठ्ठ वेतन दिले जात आहे; परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या जिवावर हे सगळे इमले उभारण्यात येत आहेत; त्या विद्यार्थ्यांना शाळा चालू होऊन २ मास होत आले, तरी अभ्यासासाठी अद्यापपर्यंत साध्या वह्याही मिळालेल्या नाहीत. गणवेष, बूट-मोजे, दप्तर आदी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
शाळा चालू होण्यापूर्वी ४ मास अगोदरच शालेय साहित्य खरेदीच्या संदर्भामध्ये निविदा प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या शिक्षण मंडळाकडे शिक्षण विभागाचा कारभार असतांनाही अशीच स्थिती होती आणि आता मागील ३ वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक असतांनाही तीच स्थिती आहे.
यंदा ‘वन टाइम व्हाउचर रेडिमशन’द्वारे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया चालू आहे; परंतु हे काम कासवगतीने चालू आहे. सध्या साहित्याचा दर्जा पडताळण्यासाठी ते प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यामुळे हे साहित्य देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांनी दिली.
संपादकीय भूमिकाअकार्यक्षम प्रशासनाच्या कासवगतीच्या कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन जवळ येऊनही गणवेश आणि अभ्यासासाठी वह्या-पुस्तके न मिळणे श्रीमंत महापालिकेसाठी ही लाजिरवाणी गोष्ट ! |