लोकसभा निवडणुकीत महाराष्‍ट्राची प्रतारणा होणार नाही, याची काळजी घेऊ ! – राज ठाकरे, अध्‍यक्ष, मनसे

महापालिकेच्‍या निवडणुका लागणार नसल्‍याचे प्रतिपादन !

मुंबई – परिस्‍थितीनुसार गोष्‍टी ठरतात. आता तुम्‍हाला सगळ्‍यांना सवयही झाली आहे; परंतु महाराष्‍ट्राची प्रतारणा होणार नाही, याची अधिकाधिक काळजी आमच्‍याकडून घेतली जाईल, अशी भूमिका मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. येत्‍या लोकसभेच्‍या निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल ? याविषयी पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे यांनी वरील उत्तर दिले.

मनसेच्‍या पदाधिकार्‍यांची १४ ऑगस्‍ट या दिवशी राज ठाकरे यांच्‍यासमवेत मुंबईमध्‍ये बैठक झाली. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी राज ठाकरे म्‍हणाले, ‘‘महाराष्‍ट्रातील राजकीय घोळात कुणी महानगरपालिकेच्‍या निवडणुका लावतील आणि पायांवर धोंडा पाडून घेतील, असे मला वाटत नाही. आता लोकसभेच्‍या निवडणुका लागतील, असे वाटत आहे. त्‍यानुसार आम्‍ही प्रत्‍येक मतदारसंघाची चाचपणी घेऊ.’’