‘सुराज्य’ माझ्यामध्ये कधी येणार ? 

‘सुराज्य’ हा शब्द जरी उच्चारला, तरी मनाला आनंद होतो. सध्याची आपल्या भोवतालची स्थिती पाहिल्यास आपल्याला ‘सुराज्या’चा प्रत्यय येत नाही. सर्वत्रच ‘कुराज्य’ अनुभवायला येते. भेसळयुक्त दुधापासून ते महिलांवरील अत्याचार आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार ! कुराज्य आहे याची असंख्य उदाहरणे आहेत, ती वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ‘बाहेरील स्थिती जशी कुराज्याची आहेत, तशीच आपल्या अंतर्मनाची स्थितीही थोड्याफार फरकाने अशीच आहे’, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.

वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील

स्वतःमध्ये ‘कुराज्य’ !

अंतर्मनाची स्थिती पाहिल्यास कामाचा ताण, प्रत्येक गोष्टीतील स्पर्धा, मला महत्त्व मिळावे, माझी प्रतिमा उंचावली जावी, यासाठीची अनाठायी धडपड, पराकोटीचा अहंभाव जोपासल्यामुळे रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे, माझे सुख, मला सर्व मिळावे या आणि यांसारख्या अनेक गोष्टी असल्यामुळे ‘मी कोण आहे ? आणि मला काय हवे आहे ?’ याचा कुठेतरी विसर पडत चालला आहे. यामुळे आनंद माझ्यामध्ये असूनही मला तो उपभोगता येत नाही. व्यक्तीमुळेच देशातही ‘कुराज्य’ आहे, असेच म्हणावेसे वाटते; कारण व्यक्तींच्या समुहामुळेच देश बनतो. व्यक्ती सात्त्विक आणि सुसंस्कारी असतील, तर देशातील वातावरणही चांगले असते.

‘सुराज्य क्रांती’चे ध्येय ठेवा !

मला माझ्यातील आनंद उपभोगायचा असेल, तर मी माझ्यामध्ये ‘सुराज्य’ निर्माण करायला हवे. याचे कारण ‘माझे शरीर हे ‘राज्य’ आहे’, असा विचार केल्यास त्यामध्ये ‘सुराज्य’ असेल, तरच जीवनातील आनंद उपभोगता येणार आहे. याचा अर्थ मी प्रत्येक कृती योग्य केली, कर्तव्याचे पालन केले, ‘मी आणि माझे’ असा विचार न करता राष्ट्र अन् धर्म यांसाठी कार्य केले, तर कुणाचाच कुणाला त्रास होणार नाही. ताण-तणाव, स्पर्धा संपून जाईल. प्रत्येकजण स्वतःकडे पाहून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत असेल. अशा रीतीने प्रत्येकामध्ये ‘सुराज्य’ आल्यास देशात ‘सुराज्य’ यायला वेळ लागणार नाही. प्रत्येकाने स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वतःमध्ये ‘सुराज्य क्रांती’ करण्याचे ध्येय ठेवूया.

‘सुराज्या’साठी धर्माचरण आवश्यक !

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला; परंतु मनात ‘सुराज्य’ नसल्यामुळे देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेल्यानंतरही खर्‍या अर्थाने ‘स्वातंत्र्य’ अनुभवता आले नाही, हे संतापजनक आहे. त्यामुळे स्वतःमध्ये ‘सुराज्य’ निर्माण करण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करूया. धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीने जीवनात आचरण कसे करावे ? याविषयीचे ज्ञान आहे. मनुष्याचा जन्म कशासाठी झाला आहे ? आणि त्याने कसे वागायला हवे ? हे केवळ धर्मच सांगू शकतो. सध्याची पिढी धर्मापासून दूर गेल्यामुळे भरकटल्याप्रमाणे वागत आहे. परिणामी ताण-तणाव, दुःख, निराशा, भय हेच पदरी पडत आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेणे, अमली पदार्थांच्या आहारी जाणे, याचे प्रमाण वाढत आहे.

भगवंताने निर्माण केलेल्या चैतन्यदायी आणि सुंदर सृष्टीचा लाभ घेण्यासाठी भगवंतानेच निर्माण केलेल्या नियमरूपी धर्माचे आचरण करून प्रत्येकाने स्वतःमध्ये ‘सुराज्य’ निर्माण करायला हवे, हे नक्की !

– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, देवद, पनवेल. (११.८.२०२३)