‘स्वातंत्र्य मिळाले ते ‘चले जाव’मुळे नव्हे, तर सशस्त्र सैन्याच्या उठावामुळे !

१. बेचाळीसचे आंदोलन केवळ ३-४ मासांचा खेळ, तर बहुसंख्य तरुणांचा कल इंग्रजांच्या सैन्यात भरती होण्याकडे !

‘स्वातंत्र्यचळवळीच्याच मर्यादा दत्तप्रसाद दाभोलकर स्पष्ट करतात. खादीचा इतका प्रचार करूनही देशातील केवळ एक टक्का लोक खादी वापरत होते, हे नमूद करतात. ‘‘बेचाळीसच्या आंदोलनाचा खेळ तीन-चार मास (महिने) चालला आणि ब्रिटिशांना चालते व्हायला गांधी सांगत होते. त्याच वेळी ८ ऑगस्ट या दिवशी आमच्या सैन्यात भरती व्हायला मिळावे म्हणून हिंदु-मुसलमान तरुण नेहमीप्रमाणेच प्रचंड गर्दी करत होते’’, हे चर्चिल यांनी रुझवेल्टना लिहिलेल्या पत्रातील वाक्यही ते उद्धृत करतात.’ (या काळात सैन्यात भरती होण्यास सावरकरांनी आवाहन केले होते. – संकलक)

२. गांधीच्या ‘चले जाव’ चळवळीचे मोल इंग्रजांच्या दृष्टीने ‘थोडी कटकट’ या पलीकडे नव्हते !

‘इंग्रजांनी केलेल्या एका गुप्त पहाणीचा संदर्भ देत दाभोलकर म्हणतात, ‘‘१९३० च्या सुमारास इंग्रजांनी ‘स्कॉटलंड यार्ड’चे नावाजलेले गुप्तहेर हिंदुस्थानातून फिरवले होते. त्यांनी अहवाल दिला होता, की न्यूनतम (किमान) २०५० पर्यंत आपल्या हिंदुस्थानातील राजवटीला कसलाही धोका नाही. गांधीजींचा सत्याग्रह आणि १९४२ चा स्वातंत्र्यलढा यांचे मोल अल्प नाही; पण इंग्रज राज्यकर्त्यांच्या दृष्टीने ‘थोडी कटकट’ या पलीकडे त्याला महत्त्व नव्हते. या प्रयत्नांतून स्वातंत्र्य खरेच मिळाले असते का ?’’

३. इंग्रजांचे सैन्य मारले गेल्याने आणि आझाद हिंद सेनेमुळे भारतीय सैन्यावर विश्वास नसल्याने, तसेच त्याच वेळी नाविक दलाने केलेल्या बंडामुळे इंग्रजांना भारत सोडावा लागला !

‘मात्र नियतीने हिटलरचे प्यादे पुढे केले. इंग्रज लढाई जिंकले; पण त्यांचे सैनिक मोठ्या प्रमाणात मारले गेले होते. त्यामुळे हिंदुस्थानात ठेवण्याइतपत इंग्रज सैनिक त्यांच्याकडे उरले नव्हते. सुभाषबाबूंच्या आझाद हिंद फौजेमुळे त्यांचा त्यांच्या काळ्या सैन्यावर असलेल्या विश्वासाचा पाया हादरला होता. मुंबईला झालेल्या नाविक दलाच्या बंडाने त्यात भर घातली होती. हिंदुस्थानातून या क्षणी साळसूदपणे निघून जाणे, यातच फार मोठे व्यावहारिक शहाणपण होते.’

– डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर
(चौफेर समाचार, दिवाळी अंक)