पितृवत् काळजी घेऊन साधनामार्गावर टिकवून ठेवणारे आणि विविध सेवा शिकवून साधिकेला निर्भय अन् स्‍वयंपूर्ण बनवणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

१. समष्‍टी सेवेला आरंभ

सौ. माया पिसोळकर

‘वर्ष १९९८ मध्‍ये मला परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने साधना समजली आणि मी लगेच सेवेला आरंभ केला. साधारण वर्ष २००५ पर्यंत गुरुदेवांनी माझ्‍याकडून प्रसाराची सेवा करून घेतली आणि प्रसारातील सेवेचा आनंद देऊन समष्‍टीतील त्‍यांच्‍या व्‍यापक रूपाचे दर्शन घडवले.

२. गुरुदेवांनी विविध सेवा शिकवून शारीरिक क्षमता वाढवणे

वर्ष २००५ पासून मला एक निराळी सेवा करण्‍याची संधी मिळाली. प्रथम मी जिल्‍हास्‍तरावर ही सेवा केली आणि नंतर एकूण ६ जिल्‍ह्यांमध्‍ये ही सेवा करण्‍याची संधी मिळाली. यापूर्वी मी कधीही एकटीने दूरवर प्रवास केला नव्‍हता. गुरुदेवांच्‍या कृपेने मला दूरचा प्रवास करता आला. गुरुदेवांनीच माझी शारीरिक क्षमता वाढवली आणि माझ्‍याकडून सेवा करून घेतली.

३. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मुले लहान असूनही साधनेत कधीच अडचण न येणे आणि सर्व कौटुंबिक कर्तव्‍ये पूर्ण करता येणे

प.पू. गुरुदेवांनी मला साधना करत असतांना पुष्‍कळ गोष्‍टी शिकवल्‍या आणि माझ्‍याकडून साधना करून घेतली. आम्‍ही (मी आणि माझे यजमान) साधनेत आलो. तेव्‍हा मुले लहानच होती; परंतु ती आम्‍हाला साधनेला पोषक अशीच होती. मुलांमुळे आम्‍हाला साधनेत कधीच अडथळा आला नाही. आम्‍ही दोघेही सेवेनिमित्त बाहेर असायचो, तरी मुले घरी व्‍यवस्‍थित रहायची. ती स्‍वतःचे आवरून अभ्‍यास करायची. हे केवळ गुरुमाऊलींमुळे (परात्‍पर गुरु डॉक्‍टरांमुळे) झाले. गुरुदेव, मुले मोठी झाल्‍यानंतर त्‍यांचे शिक्षण, त्‍यांची लग्‍न-कार्ये आणि सर्व कर्तव्‍ये आपणच आमच्‍याकडून पूर्ण करून घेतली. मुलगी, जावई, मुलगा आणि सून  सर्व साधना करत आहेत. ‘गुरुदेव, आमच्‍या संपूर्ण कुटुंबियांची काळजी आपण क्षणोक्षणी घेत आहात. त्‍याबद्दल आपल्‍या चरणी मी कृतज्ञ आहे.

४. अनेक संघर्षाचे प्रसंग येऊनही साधनेत टिकवून ठेवले आणि काहीच अल्‍प पडू न देता अनुसंधानात ठेवले !

‘गुरुदेव, आमच्‍या जीवनात अनेक संघर्षाचे प्रसंग आले; पण त्‍यातून आपणच आम्‍हाला पित्‍याप्रमाणे अलगद बाहेर काढले. कुठेही कसली झळ लागू दिली नाही. आपणच आम्‍हाला साधनेत टिकवून ठेवलेत. मनात कसलाही विकल्‍प येऊ दिला नाहीत. ही आपली कृपाच आहे. आम्‍हाला मानसिकदृष्‍ट्या आणि आर्थिकदृष्‍ट्या कधीच काही अल्‍प पडू दिले नाहीत आणि आमचे अनुसंधान टिकवून ठेवलेत, हे केवळ आपल्‍या कृपेनेच आम्‍हाला शक्‍य झाले. आपण क्षणोक्षणी आमची काळजी घेतली, त्‍याबद्दल आपल्‍या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे गुरुदेव !

५. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी विविध सेवा शिकवून निर्भय आणि स्‍वयंपूर्ण बनवणे

माझे यजमान प्रसारासाठी बाहेरगावी असायचे. तेव्‍हा मी आणि मुले घरी असायचो. त्‍या वेळी तुम्‍ही आम्‍हाला निर्भय आणि स्‍वयंपूर्ण बनवून आमची काळजी घेतलीत. आपल्‍या कृपेमुळेच मी वाहन चालवायला आणि संगणकावर सेवा करायला शिकले. ‘सेवा अचूकपणे कशी करायची ?’, हे मला शिकता आले. भ्रमणभाषच्‍या माध्‍यमातून आपणच मला विविध सेवा करण्‍यास शिकवल्‍या.

६. या कार्यशाळेत चुका मांडतांना मनावर ताण न येणे आणि प्रत्‍येक सत्रात सतर्क राहून शिकता येणे

मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात होणार्‍या कार्यशाळेच्‍या वेळी ताण यायचा. त्‍यामुळे माझे मन आणि बुद्धी यांवर आवरण यायचे. तेव्‍हा मला झोप यायची आणि कार्यशाळेत सांगितलेली सूत्रे समजत नसत; पण गुरुदेवा, या वेळी मला शिबिरामध्‍ये तुम्‍ही पुष्‍कळ उत्‍साह दिलात. प्रत्‍येक सत्रामध्‍ये सतर्क राहून शिकण्‍याची बुद्धी दिलीत. या वेळी मला चुका मांडतांना मनावर ताण येत नव्‍हता. त्‍यामुळे या शिबिरात मला पुष्‍कळ आनंद मिळाला.

७. कृतज्ञता

गुरुदेवा, मी साधनेत आले नसते, तर मायेतच रमले असते. गुरुदेवा, तुम्‍ही मला सर्व शिकवून पुष्‍कळ आनंद दिलात. मला ते शब्‍दांत मांडता येत नाही. मला सर्वांसमोर बोलण्‍याचा ताण येतो, भीती वाटते; पण ‘मी लिखाण तर करू शकते ना ?’ हा विचारही आपणच माझ्‍या मनात घातलात आणि तुम्‍ही माझ्‍याकडून लिखाण करून घेतले. गुरुदेवा, त्‍याबद्दल मी आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

८. प्रार्थना

‘गुरुदेवा, मला लवकरात लवकर आपल्‍या चरणांशी यायचे आहे. माझ्‍याकडून साधनेचे प्रयत्न आपणच करून घ्‍या. माझ्‍या मनात आपल्‍या चरणांशी येण्‍याची ओढ निर्माण करा आणि लवकरात लवकर आपल्‍या चरणांशी घ्‍या’, अशी मी आपल्‍या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. माया पिसोळकर (वय ५४ वर्षे), अमरावती सेवाकेंद्र (९.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक