रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दैवी बालके, युवा साधक आणि प्रबुद्ध साधक (३० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले साधक) यांच्यासाठी प्रतिदिन दैवी सत्संग घेतला जातो. या सत्संगामध्ये त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा घेतला जातो, तसेच ‘प्रतिदिन कोणते ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न करायचे ?’, याविषयी सांगितले जाते. या सत्संगाच्या संदर्भात रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
‘मी प्रतिदिन सकाळी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करते. त्या वेळी मी श्रीकृष्णाला ‘आज दिवसभर मी कोणते ध्येय ठेवून साधना करू ?’, असे विचारते आणि श्रीकृष्ण मला सूक्ष्मातून माझ्या ध्येयाविषयी सांगतो. १५.३.२०२२ या दिवशी मी श्रीकृष्णाला विचारले, ‘आज मी काय ध्येय ठेवू ?’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ‘आज तू सिद्धिविनायकाचे स्मरण आणि नामजप कर.’ तेव्हा मी श्रीकृष्णाला म्हटले, ‘मी आधी ‘श्री विष्णवे नमः ।’, हा नामजप करते. त्यानंतर मी ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि नंतर ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’, हा नामजप करते.’ त्या वेळी श्रीकृष्ण मला म्हणाला, ‘आता तू सिद्धिविनायकाचा नामजप कर. संध्याकाळी ‘श्री विष्णवे नमः ।’ आणि नंतर ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’ हा नामजप कर.’ त्याप्रमाणे मी ध्यानमंदिरात बसून ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।, हा नामजप केला.
१४.३.२०२२ या दिवशी मी सत्संगाला उपस्थित नव्हते. त्यामुळे ‘सत्संगात कोणते ध्येय दिले होते ?’, याविषयी मला ठाऊक नव्हते. १५.३.२०२२ या दिवशी सत्संगामध्ये सर्व बालसाधक आणि युवा साधक श्री सिद्धिविनायकाच्या नामजपाविषयीचा आढावा सांगत होते. त्या वेळी ‘माझे ध्येय पूर्ण व्हावे’, यासाठीच श्रीकृष्णाने मला प्रथम ‘श्री सिद्धिविनायका’चा नामजप करण्यास सांगितला’, याची जाणीव होऊन माझ्याकडून श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
त्या वेळी ‘श्रीकृष्ण सत्संगाला उपस्थित आहे. तो सर्वांकडे पहात आहे अन् परात्पर गुरु डॉ. आठवलेही सूक्ष्मातून सत्संगाला उपस्थित आहेत’, असे मला जाणवले.
मला या दैवी सत्संगात उपस्थित रहाण्याची संधी देऊन ही अनुभूती दिल्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.३.२०२२)
|