५ मुसलमानबहुल मतदारसंघ अनुसूचित जाती आणि जमाती यांसाठी आरक्षित !

  • आसाम राज्यातील मतदासंघांची फेररचना !

  • धर्मांध मुसलमानांनी दर्शवला विरोध !

  • बोडो समुदायासाठी मतदारसंघांची संख्या वाढल्याने बोडोंच्या संघटना समाधानी !

गौहत्ती (आसाम) – राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आसाम राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचे नव्या रूपाने सीमांकन केले आहे. यामध्ये राज्यातील १४ लोकसभा आणि १२६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यांतर्गत १ लोकसभा आणि १९ विधानसभा क्षेत्रांचे नावही पालटण्यात आले आहे. यांतील ५ मुसलमानबहुल विधानसभा क्षेत्रांमधील उमेदवार हे मुसलमानांऐवजी आता अनुसूचित जाती आणि जमाती यांचे असतील. यामुळे येथून कोणताही मुसलमान उमेदवार हा ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून निवडून येणार नाही. त्यामुळे येथील धर्मांध मुसलमान संतप्त झाले आहेत, असे वृत्त आहे. दुसरीकडे बोडोलँड क्षेत्रातील विधानसभा क्षेत्रांची संख्या ११ पासून १५ करण्यात आली आहे. बोडो समुदायासाठी अधिक प्रतिनिधित्व मिळाल्याने त्यांच्या संघटनेने यावर समाधान व्यक्त केले आहे. पंचायत आणि शहरी स्तरावरील मतदान क्षेत्रांमध्ये मात्र कोणताही पालट करण्यात आलेला नाही.

१. निवडणूक आयोगाने सांगितले की, राज्यातील एकूण १९ विधानसभा आणि २ लोकसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातींसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच १ लोकसभा आणि ९ विधानसभा क्षेत्रे अनुसूचित जातींसाठी आरिक्षत असतील. याआधी अनुसूचित जमातीसाठी विधानसभेच्या १६ आणि अनुसूचित जातींसाठी ८ मतदारसंघच आरक्षित होते.

२. निवडणूक आयोगाने केलेल्या या पालटांच्या अंतर्गत काही मतदारसंघांची नावेही पालटण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मानकचार विधानसभा क्षेत्राचे नाव पालटून ते बीरसिंह जरुआ, दक्षिण सलमाराचे मानकचार, गोबरधनचे मानस, तर दक्षिण करीमगंज मतदारसंघाचे नाव पालटून ते पत्थरकंडी करण्यात आले आहे.

३. आयोगाने जारी केलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे की, एकूण १ सहस्र २०० आवेदन पत्रांचा विचार करण्यात आला. वर्ष १९७६ नंतर प्रथमच अशा प्रकारे मतदारसंघांचे सीमांकन करण्यात आले आहे.

४. राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यासंदर्भात म्हणाले की, लोकांनी केलेल्या मागण्या आणि राज्यशासनाने दिलेल्या काही मतांचा स्वीकार करत हे सीमांकन करण्यात आले. वर्ष २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपच्या घोषणापत्रात सीमांकनाचे सूत्र होते. आम्ही आमचे वचन पूर्ण केले आहे.

५. आसामच्या बोडो समुदायासाठी कार्य करणार्‍या ‘निखिल बोडो विद्यार्थी संस्था’, ‘बोडो जातीय परिषद’, ‘बोडो साहित्य सभा’, ‘बोडो क्षेत्रीय परिषद’, ‘दुलाराई बोडो हरिमु अफाद’, ‘दुलाराई बाथो महासभा’ आणि ‘बोडो महिला कल्याण परिषद’ या संघटनांनी संयुक्त रूपाने पत्रकार परिषद घेऊन या सीमांकनावर आनंद व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

  • आसाममध्ये घुसखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुसलमानबहुल मतदारसंघातून स्वतःला हवा तो उमेदवार निवडून आणण्याचा धर्मांधांचा प्रयत्न असे. राज्याच्या सुरक्षेवर त्याचा थेट परिणाम होत असे. मतदारसंघांच्या फेररचनेमुळे याला आळा बसणार असल्यामुळेच धर्मांध मुसलमान थयथयाट करत आहेत, हे जाणा !