लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सायखेडा ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय
नाशिक – गेल्या अनेक वर्षांपासून समाजात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकदा प्रेमविवाहातून दुर्दैवी घटना घडल्या आहेत. याचा सर्वाधिक मनस्ताप संबंधितांच्या कुटुंबियांना होतो. त्या पार्श्वभूमीवर प्रेमविवाह करायचा असेल, तर आई-वडिलांची अनुमती घेणे आवश्यक आहे. त्याविना नोंदणी कार्यालयानेही अनुमती देऊ नये, असा ठराव नाशिक जिल्ह्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने घेतला आहे.
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील निफाड (Niphad) तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने प्रेम विवाहा संदर्भात महत्वपूर्ण ठराव केला आहे.https://t.co/8ffHEiQl18#Nashik #NashikNews
— ABP माझा (@abpmajhatv) August 13, 2023
१. प्रेमविवाहात अट घालणारी आणि त्यासंबंधी ठराव पारित करणारी सायखेडा ग्रामपंचायत बहुदा राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
२. माजी सरपंच भाऊसाहेब काकडे यांनी याविषयी पंचायतीला पत्र दिले होते. त्यावर ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या ठरावानुसार आई-वडिलांचे अनुमती पत्र असेल, तरच विवाहाची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी करण्यात येईल. त्यांनाच विवाह केल्याचा दाखला मिळेल.
३. सदर ठरावाची प्रत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. या निर्णयाची महाराष्ट्रात कार्यवाही व्हावी, यासाठी कायदा करून आदर्श कुटुंबपद्धत कार्यान्वित व्हावी, यासाठी आता सरपंच गणेश कातकाडे, सुधीर शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार आहेत.
४. सायखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश कातकाडे म्हणाले की, प्रेमविवाहामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सामाजिक मानहानी होत असल्याने आई-वडील टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची अनुमती आवश्यक असल्याचा ठराव संमत केला आहे, तसेच राज्यस्तरावर कायदा व्हावा, यासाठी लवकरच ग्रामपालिका प्रशासन, मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकारी यांची भेट घेणार आहोत.