उत्तरप्रदेशचे कानपूर शहर बनले ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड !

गेल्या काही वर्षांत शेकडो हिंदु कुटुंबांचे करण्यात आले धर्मांतर !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

कानपूर (उत्तरप्रदेश) – शहरात प्रत्येक मासाला धर्मांतराचे एकतरी प्रकरण समोर येत आहे. शहर धर्मांतराचा गड बनला आहे. ख्रिस्ती मिशनरी येथील झोपड्यांमध्ये जाऊन तेथील हिंदूंना औषधोपचार, पैसे, विवाह, नोकरी, व्यवसाय आदींचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करीत आहेत. अशी प्रकरणे उघड झाल्यावर पोलिसांनी संबंधित मिशनर्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणी काही मिशनर्‍यांना अटक करण्यात आली आहे; परंतु या सर्वांमागील सूत्रधारापर्यंत पोचणे कठीण होत आहे. मिशनर्‍यांना विदेशातून पैसा येत असल्याचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. शहरातील घाटमपूर, चकेरी, रावतपूर, कर्नलगंज आणि आता मुन्नीपुरवा येथून धर्मांतराच्या घटना समोर आल्या आहेत.

१. मुन्नीपुरवा : नुकत्याच समोर आलेल्या जुन्या कानपूरच्या नवाबगंज येथील मन्नीपुरवा क्षेत्रातील धर्मांतराच्या प्रकरणात शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले. यासंदर्भात प्रार्थनासभेत सहभागी होण्याचा दबाव आणल्यावर एका धर्मांतरित कुटुंबाने मिशनर्‍यांचा निषेध करत विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल आणि पोलीस यांना सूचना दिली. छोटू या हिंदूची पत्नी बबलीदेवी हिने धाडस दाखवून पोलिसांत तक्रारही प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी ११ ऑगस्ट या दिवशी कारवाई करत मॅकलोन सिंह आणि मॉरिस सिंह यांच्या विरोधात धर्मांतरविरोधी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. पीडित कुटुंबाने सांगितले की, धर्मांतर करणार्‍यांना १० ते ३० सहस्र रुपये दिले जात आहेत. आजारी लोकांवर औषधोपचार केले जात आहेत, तसेच अविवाहितांचा विवाह लावून दिला जातो. त्यामुळे असाहाय्य हिंदु कुटुंब धर्मांतर करते.

पोलीस उपायुक्त अकमल खान यांनी सांगितले की, गेल्या ४-५ वर्षांत २०० हिंदु कुटुंबांना ख्रिस्ती बनवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर विष्णुपुरीमध्ये ‘समृद्ध चर्च’ही उभारण्यात आले आहे. येथे प्रार्थनासभांचे आयोजन करून लोकांना औषधोपचार, पैसे, विवाह, नोकरी, व्यवसाय आदींचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले.

२. घाटमपूर : घाटमपूरमध्ये गेल्या काही वर्षांत १५ हून अधिक चर्च उभारण्यात आली आहेत. या भागात शेकडो हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्यात आले आहे. आरोपी ख्रिस्त्यांना अटक करून जामीन मिळाल्यावर ते पुन्हा धर्मांतरासाठी काम करू लागतात.

३. श्यामनगर : शहरातील श्यामनगर भागात अभिजित आणि रजत जिप्सम या मिशनर्‍यांना अटक करण्यात आली आहे. याचा सूत्रधार रजत जिप्सम असून तो दक्षिण कोरियाचा नागरिक आहे.

४. रावतपूर : शहरातील रावतपूर क्षेत्रातील थारू वस्तीत रहाणारा ‘नीरज’ नावाचा युवक मद्यपान करत असल्याने त्याचे मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाले होते. यानंतर त्या भागात पंजाब येथून आल्याचे सांगत एका ख्रिस्ती मिशनर्‍याने आजारी लोकांची माहिती गोळा केली. त्या सर्वांचे आजार बरे करण्याचे प्रलोभन देऊन तेथे प्रार्थनासभा आयोजित होऊ लागली. सभेला शेकडो हिंदू उपस्थित राहू लागले. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच सर्व मिशनरी तेथून पळून गेले.

५. कर्नलगंज : कर्नलगंज क्षेत्रात असलेल्या चुन्नीगंजच्या ‘एपी फॅनी शाळे’च्या परिसरात एका मासापासून प्रार्थनासभा आयोजित करण्यात येत होती. याला शेकडो हिंदू उपस्थित रहात होते. त्यांना विविध प्रलोभने देऊन धर्मांतरित करण्याचे प्रयत्न चालू होते. बजरंग दल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांना याची माहिती मिळताच त्यांनी या विरोधात आवाज उठवला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत गुन्हा नोंद केला आणि पादरी अमित लॉयल याच्यासह अन्य एका मिशनर्‍याला अटक केली.

संपादकीय भूमिका

  • राज्यात धर्मांतरविरोधी कायदा असूनही अशा प्रकारे हिंदूंचे दिवसाढवळ्या होत असलेले धर्मांतर म्हणजे ख्रिस्ती मिशनर्‍यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही, हेच स्पष्ट करते. ही स्थिती उत्तरप्रदेश प्रशासनासाठी लज्जास्पद !
  • कानपूरसारख्या समृद्ध शहरात ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या वाढत्या कारवाया चालू आहेत, तर ग्रामीण भारतामध्ये त्यांचे कार्य कोणत्या स्तरापर्यंत पोचले असेल, याचा विचारच न केलेला बरा ! यावर आता हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय आहे, हे जाणा !
  • कानपूर हे उत्तरप्रदेशातील समृद्ध शहरांपैकी महत्त्वाचे शहर आहे. येथे मोठमोठे कारखाने आणि जगप्रसिद्ध ‘आयआयटी कानपूर’ असूनही ख्रिस्ती मिशनरी हिंदूंच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवत आहेत. यातून समृद्धी आणि शिक्षण यांचा जनतेच्या सुरक्षिततेशी काडीचाही संबंध नसल्याने विकासासोबत हिंदूंचे रक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे, हे जाणा !