हिंदू, हिंदुत्व आणि राहुल गांधी
भाग ४
१. कृतज्ञताभाव असणे, हे हिंदुत्वाचे वैशिष्ट्य !
‘हिंदुत्व हे कृतज्ञताभाव शिकवणारे एक उच्च प्रतीचे तत्त्वज्ञान आहे; म्हणून मानवी जीवनाला सृष्टीतील जे जे घटक उपयोगी पडतात, त्यांचे जीवन सुखी, समृद्ध, आरोग्यदायी आणि आनंदी बनवतात, त्या प्रत्येक घटकांना हिंदूंनी देवत्व बहाल केले आहे. सूर्य, अग्नी, वायू, जल, गाय, नंदी यांना देवतास्वरूप मानून त्यांची पूजा करण्यास सांगितले आहे. अन्नाला तर ‘पूर्णब्रह्म’ मानले आहे. इंधनासाठी केवळ वाळलेले वृक्षच तोडायचे, हिरव्या झाडावर कधीही कुर्हाड चालवायची नाही, हे पथ्य पाळण्याचे निर्देश हिंदु धर्मात फार पूर्वीपासून देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर औषधासाठी ज्या हिरव्या वृक्षाची पाने, फुले, फांद्या, फळे तोडावी लागतात, त्या वेळी ‘त्या वृक्षाची क्षमा मागून संमती घ्यावी’, असेही आयुर्वेदात म्हटले आहे.
२. सर्व जगच ब्रह्ममय मानणारे (भेदभावरहित) हिंदुत्व !
‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ म्हणजे ‘सर्व जगच ब्रह्ममय आहे’, असे हिंदूंचे तत्त्वज्ञान सांगते. सर्व जग हे एकाच ब्रह्मापासून निर्माण झाले आहे. त्या जगाचे पोषणही ब्रह्मापासूनच होते आणि शेवटी ते ब्रह्मातच विलीन होणार आहे. मग भेदाभेद, द्वैत आणि अमंगल यांचा प्रश्न येतोच कुठे ? म्हणून प्रत्येकाने त्या ब्रह्माचेच चिंतन केले पाहिजे.
आद्यशंकराचार्य म्हणतात, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या । जीवो ब्रह्मैव नापरः।’ म्हणजे ‘ब्रह्म हेच सत्य आहे आणि बाकी सारे जग मिथ्या आहे. पृथ्वीवरचा प्रत्येक जीव ब्रह्ममयच आहे.’ ‘मी वेगळा, तू वेगळा’ हे द्वैत किंवा ‘मी श्रेष्ठ, तो कनिष्ठ’, हा भेदभाव हिंदुत्वाला मान्य नाही.
३. सर्व जगच ईश्वरमय मानत असल्याने हिंदु धर्मात ‘शोषण’ नाही !
ईशावास्योपनिषदात म्हटले आहे की,
‘ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥’
– ईशावास्योपनिषद, मंत्र १
याचा अर्थ ‘या गतीशील विश्वात जे काही दृश्यमान जग आहे, त्या सर्वांत ईश्वराचाच निवास आहे. त्यामुळे या जगातील वस्तूंचा, साधनांचा, नैसर्गिक स्रोतांचा उपभोग घेतांना तो त्यागपूर्वक, म्हणजे आपल्याला आवश्यक तेवढ्या मर्यादेपर्यंतच घ्यायला हवा. ‘सर्व काही माझेच आणि माझ्या एकट्यासाठीच’, असे समजून संपत्तीचा लोभ धरू नये; म्हणूनच हिंदु धर्मात गायीचे म्हणा, सृष्टीचे म्हणा, ‘दोहन’ अभिप्रेत आहे. ‘शोषण’ अभिप्रेत नाही. गायीच्या दुधाचे दोहन (धार काढणे) करण्यापूर्वी आपण गायीला पोटभर खाऊ घालतो. तिच्या बछड्यासाठी (वासरासाठी) आवश्यक तेवढे दूध तिच्या आचळात शिल्लक ठेवून उर्वरित दूध काढून घेतो. ‘प्रथम दहा वृक्ष लावले पाहिजेत, तरच एक वृक्ष तोडण्याचा अधिकार मनुष्याला प्राप्त होतो’, असे हिंदु धर्मात सांगितले गेले आहे.
४. ‘धर्म’ हेच सर्वांचे मूळ मानणारे हिंदुत्व !
अ. जगत स्थितिकारणं प्राणिनाम साक्षात ।
अभ्युदयानिःश्रेहे तुर्य स धर्मः॥
म्हणजे ‘सर्व जगाची स्थिती आणि व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती होणे, अभ्युदय होणे आणि समवेत पारलौकिक उन्नती होणे, म्हणजे मोक्ष मिळणे’, या तीन गोष्टी साध्य होतात. त्याला ‘धर्म’ असे म्हणतात.
आ. हिंदु धर्मात मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूचा किती सूक्ष्मपणे अभ्यास आपल्या पूर्वजांनी केला आहे हे पाहिले की, स्तिमीत व्हायला होते; कारण मानवी जीवन फार दुर्लभ आहे. हे आमचे पूर्वज असणार्या ऋषिमुनींना, साधू-संतांना पूर्णपणे ज्ञात होते. असे हे दुर्लभ मानवी जीवन व्यर्थ वाया जाऊ नये, ‘नराचा वानर नव्हे, तर नारायण व्हावा’, अशी त्यांची इच्छा होती; म्हणून ‘प्रत्येक व्यक्तीने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांचा अवलंब करून अंतिम ध्येय साध्य करावे’, असे त्यांचे म्हणणे आहे. सर्व पुरुषार्थांचा पाया मात्र ‘धर्म’ असावा, असे म्हटले आहे. हिंदु धर्मात सर्व सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. ‘सुखस्य मूल धर्मः।’ (अर्थ : सुखाचे मूळ धर्म आहे.), असे हिंदु धर्माचे जणू घोषवाक्यच आहे, म्हणजे मानवी जीवन असो, समाजजीवन असो, राष्ट्रजीवन असो हे सर्व सुरळीत रहावे आणि चालावे, असे वाटत असेल, तर प्रत्येकाच्या जीवनाला धर्माचे, म्हणजे नीतीचे अधिष्ठान हवेच. नाही तर वैयक्तिक असो, सामाजिक असो किंवा राष्ट्रजीवन असो, त्यांचा नाश झाल्याविना रहाणार नाही.
इ. केवळ हिंदु तत्त्वज्ञानात धर्माला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.
‘आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम।
धर्मो हि तेषामधिको विशेषः धर्मेण हीना पशुभिः समानाः॥’
म्हणजे ‘मनुष्य जीवनात धर्माला स्थान नसेल, तर त्याच्या आणि पशूंच्या जीवनात काहीच भेद नाही. धर्म हा शब्द ‘धृ’ या धातूपासून निर्माण झाला आहे. ‘धृ’ म्हणजे धारण करणे, पोषण करणे, आधार देणे, वाढ करणे. कशाचे धारण, पोषण, वाढ करायची ? तर दया, करुणा, प्रेम, सहिष्णुता, परस्पर सहकार्य यांची.
५. हिंदु धर्माच्या वैशिष्ट्यांचे विविध पैलू उलगडणार्या धर्माच्या व्याख्या !
अ. हिंदु धर्मात धर्माच्या अनेक व्याख्या केल्या आहेत. एका व्याख्येत म्हटले आहे.
‘धारणात धर्म इत्याहू तद धर्म धारयेत प्रजा ।
धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः॥’
याचा अर्थ ‘जो मानवाकडून धारण केला जातो तो धर्म. हा धर्म कोणता ? तर सर्व मानवमात्रांचे आणि सृष्टीचे रक्षण करणारा, सर्वांना सुख, शांती, समृद्धी, समान न्याय देणारा. धर्म म्हणजे समाज आणि सृष्टी यांप्रतीच्या आपल्या निहित कर्तव्याचे वहन करणे. धर्म म्हणजे आचरण. धर्म म्हणजे व्यवहार. अशा धर्माचे जो मनुष्य आणि समाज पालन करतो, तोच मनुष्य अन् समाज प्रगती करू शकतो. जो मनुष्य आणि समाज या धर्माचे पालन करत नाही, त्या मनुष्याचा अन् समाजाचा नाश होतो.’
आ. एका सुभाषितात म्हटले आहे,
‘यद् अन्यै विहितं न इच्छति
आत्मनः कर्म पुरुषः ।
न तत परेषु कुर्वीत जानम
अप्रियम् आत्मनः ।’
म्हणजे ‘प्रत्येक मनुष्याला वाटते दुसर्याने आपल्याशी अप्रिय वागू नये; पण नुसते वाटून काय उपयोग ? त्यासाठी आपणही इतरांशी अप्रिय न वागण्याचे पथ्य पाळले पाहिजे; म्हणून जे दुसर्यांनी आपल्याशी करू नये, असे वाटते ते कर्म आपल्याला अप्रिय आहे जाणून दुसर्यांच्या संदर्भातही करू नये.’
इ. ‘समाजाने तुम्हाला काय दिले ?’, यापेक्षा ‘तुम्ही समाजाला काय दिले ?’, याचा अधिक आणि प्रथम विचार करा’, अशी हिंदु धर्माने शिकवण दिली आहे.
‘जीवने यावदादानं स्यात्प्रदानं ततोऽधिकम् ।
इत्येषा प्रार्थनास्माकं भगवान परिपूर्यताम ॥’
म्हणजे ‘हे परमेश्वरा, आमची तुला प्रार्थना आहे की, आम्ही जीवनात जेवढे कमावले आहे, त्यापेक्षा अधिक समाजाला देण्याची शक्ती आणि सद्बुद्धी आमच्याकडे असावी.’
ई. हाच उद्देश दुसर्या एका सुभाषितात सांगतांना म्हटले आहे,
‘अप्राप्तस्य प्राप्तिः प्राप्तस्य रक्षणम्।
रक्षितस्य वर्धनम् वर्णितस्य पात्रे विनियोगः।’
म्हणजे ‘जे मिळाले नाही ते मिळवा, जे मिळाले त्याचे रक्षण करा, जे रक्षण केले ते वाढवा आणि जे वाढवले तेे सत्पात्री दान करा.’ पूर्वी आमच्या देशात राजे-महाराजे मोठे यज्ञयाग करत असत. त्या यज्ञाची यशस्वी सांगता झाल्यानंतर आतापर्यंत कमावलेले धन राजा मुक्त हस्ताने गरीब आणि गरजू प्रजाजनांमध्ये वाटत असेे.
उ. ‘परोपकारः पुण्यायः पापाय परपीडनम् ।’
म्हणजे ‘हिंदु धर्मात इतरांना पीडा देणे, हे पाप’ समजले गेले आहे. महर्षि व्यास १८ पुराणांचे सार एका वाक्यात सांगतांना म्हणतात, ‘दुसर्यावर उपकार करणे, त्याचे भले करणे, हेच पुण्य आहे, तर दुसर्याला दुःख देणे, पीडा देणे, हे पाप आहे.’
६. स्त्रीला पुरुषाप्रमाणे किंवा अधिक सन्मान !
अ. हिंदु धर्माचे अजून सुंदर वैशिष्ट्य म्हणजे या धर्मात स्त्रीला पुरुषाइतकेच, तर केव्हा केव्हा पुरुषापेक्षा अधिक महत्त्व आणि मानसन्मान दिला गेला आहे. इतर पंथांत मात्र स्त्रीला कोणत्याही प्रकारचे महत्त्व दिले गेले नाही; किंबहुना तिला केवळ पुरुषांची सेवा करणारी एक दासी, वाटेल तेवढ्या संततींना जन्म देणारी एक भोगदासी, असे अत्यंत हीन स्वरूप देण्यात आले आहे. तिच्या आशाआकांक्षेचा कोणताही विचार करण्यात आला नाही. तिला मन असते, तिचाही काही मानसन्मान असतो, याचा विचारच करण्यात आला नाही. हिंदु धर्मात स्त्रीला ‘प्रकृती’ मानण्यात आले आहे. ‘प्रकृती’विना पुरुष ‘अपूर्ण’ मानला जातो. ‘सृष्टीच्या उत्पत्तीचे मूळ पुरुष प्रकृतीच्या मिलनात’ असल्याचा वैज्ञानिक सिद्धांत हिंदूंना फार पूर्वीपासून ज्ञात झाला होता. हिंदु धर्मात स्त्रीला अर्धांगी मानले जाते; म्हणून आमच्या भगवान शंकराच्या अनेक रूपांपैकी त्यांना ‘अर्धनारीनटेश्वर’ या एका रूपातही दाखवले जाते आणि पूजले जाते. हिंदु धर्मात कोणतेही धार्मिक कार्य स्त्रीविना पूर्ण होत नाही.
आ. हिंदु धर्मात स्त्रियांना अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य असल्यामुळे प्राचीन काळापासून या धर्मात वेद उपनिषदामधील ऋचा रचणार्या गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यांसारख्या अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या.
‘अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा ।
पंचकन्या स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।’
याचा अर्थ ‘अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या ५ कन्या प्रातःस्मरणीय आणि ‘महापातकांचा नाश करणार्या’ आहेत’, असे म्हटले आहे.
इ. हिंदूंनी पृथ्वीला विष्णुपत्नी इतकी पवित्र आणि सन्माननीय मानले आहे. सकाळी उठल्यानंतर भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी आम्ही हात जोडून म्हणतो,
‘समुद्रवसनेदेवी पर्वतस्तनमंडले ।
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥’
म्हणजे ‘जिने समुद्ररूपी वस्त्र धारण केले आहे. पर्वत हे जिचे स्तनमंडल आहे. त्या विष्णुची पत्नी असणार्या हे भूमीदेवी मी तुला पायाने स्पर्श करत आहे. त्यासाठी तू मला क्षमा कर.’
उ. स्त्रियांच्या मातृत्वाविषयी हिंदु धर्मात जेवढ्या उत्कटतेने कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यात आला आहे, तेवढा अन्य कोणत्याही धर्मात व्यक्त करण्यात आला नाही. मनुस्मृतीत म्हटले आहे.
‘यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता ।
यत्र यत्रास्ते न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला कियाः ॥’
म्हणजे ‘जेथे स्त्रियांची पूजा होते. तेथे प्रत्यक्ष देवता निवास करतात आणि जेथे स्त्रियांची पूजा होत नाही, तिचा सन्मान होत नाही. तेथे केलेले सर्व कर्म निष्फळ होतात.’
ऊ. धर्माची व्याख्या करतांना आद्यशंकराचार्य म्हणतात.
‘मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत ।
आत्मवत सर्व भुतेषु । एष सनातन धर्म ॥’
म्हणजे ‘हिंदु धर्माने ‘पर स्त्री’ असो कि ‘परधन’ त्याला मृत्तिका, म्हणजे मातीसमान मानले आहे. एवढेच नव्हे, तर स्वतः आणि इतरांमध्ये अभिन्नत्वही मानले आहे.’
अशा अनेक सुभाषितातून हिंदु धर्माचे महान स्वरूप प्रगट झाले आहे.
भारतीय संस्कृतीत स्त्रियांविषयी व्यक्त केलेली ही भावना किती उत्कट, मानवीय आणि सुंदर आहे. तेव्हा हिंदु धर्मावर टीका करणार्यांनी हिंदु धर्मातील ही उदात्तता, समानता आणि सर्वांना असणारे अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य ही मूल्ये प्रथम समजून घेतली पाहिजेत.’
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.