सातारा पालिका कर्मचार्‍याच्‍या कागदपत्रांचा अपलाभ घेत वाहनखरेदी !

नीतीमत्तेचा र्‍हास होत असल्‍याचे उदाहरण !

सातारा, ९ ऑगस्‍ट (वार्ता.) – सातारा नगरपालिकेतील युवराज श्रीपती शिंगाडे हे स्‍वच्‍छता कर्मचारी म्‍हणून सेवा करतात. त्‍यांच्‍या कागदपत्रांचा अपलाभ घेत दोघांनी त्‍यांना फसवून टोयोटा वाहन खरेदी केले. याविषयी शिंगाडे यांना माहिती मिळताच त्‍यांनी जिल्‍हा पोलीस अधीक्षकांकडे दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

शिंगाडे यांना घरदुरुस्‍तीसाठी कर्ज हवे होते. त्‍यासाठी त्‍यांनी संशयिताला कर्ज काढण्‍यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे दिली; मात्र या संशयिताने कागदपत्रांद्वारे शिंगाडे यांना अंधारात ठेवून ९ लाख रुपये कर्ज संमत करून घेतले. या रकमेतून त्‍यांनी चारचाकी वाहन खरेदी केले. वाहनाचा विमाही त्‍यांनी शिंगाडे यांच्‍या नावाने दिला. जेव्‍हा विमा आस्‍थापनाच्‍या कर्मचार्‍याने दूरभाषद्वारे त्‍यांना हप्‍त्‍याविषयी कळवले, तेव्‍हा शिंगाडे यांना त्‍यांच्‍या नावावर वाहन खरेदी झाल्‍याचे समजले. शिंगाडे यांच्‍या मुलाने याविषयी सर्व माहिती घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्‍याकडे तक्रार केली.