केंद्र सरकारच्‍या ‘नमामि गंगे’ या कार्यक्रमांतर्गत इंद्रायणी नदी सुधार करण्‍याचा निर्णय !

पुणे – इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्‍त करण्‍यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (‘पी.एम्.आर्.डी.ए.’ने) सिद्ध केलेल्‍या ५०० कोटी रुपयांच्‍या सुधारणा आराखड्यास राज्‍य सरकारच्‍या प्रधान सचिव, पर्यावरण विभाग स्‍तरावरील प्रदत्त समितीने तत्त्वतः मान्‍यता दिली. अंतिम मान्‍यतेसाठी आराखडा केंद्र सरकारच्‍या एन्.आर्.सी.डी.कडे पाठवण्‍यात येईल. आराखड्यात नदीकाठावर १८ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍प प्रस्‍तावित केले आहेत. केंद्र सरकारच्‍या ‘नमामि गंगे’ या कार्यक्रमांतर्गत इंद्रायणी नदीसुधार करण्‍याचा निर्णय ‘पी.एम्.आर्.डी.ए.’ने घेतला आहे. राज्‍य सरकारच्‍या ‘प्रदत्त समिती’समोर झालेल्‍या बैठकीत अहवाल सादर झाला.

१. नदीसुधार प्रकल्‍पासाठी ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून त्‍यास मान्‍यता मिळाल्‍यास केंद्र सरकार ६० टक्‍के, तर राज्‍य सरकारकडून ४० टक्‍के निधी उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे.

२. या प्रकल्‍पांतर्गत नदीची लांबी ही १०३.५ कि.मी. (कुरवंडे गावापासून ते तुळापूर येथील भीमा नदीपर्यंतचा भाग) असून त्‍यापैकी १८ कि.मी. लांबीची नदी ही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या परिसरातून जाते आणि तेथील नदीच्‍या दोन्‍ही तीरावरील सुधारणा प्रकल्‍पाचे काम हे महापालिकेकडून करण्‍यात येणार आहे. उर्वरित ८७.५ कि.मी.चे काम हे ‘पी.एम्.आर्.डी.ए.’कडून करण्‍यात येत आहे.

३. लाखो वारकर्‍यांची भावना या नदीशी जोडली आहे. त्‍यामुळे ती प्रदूषणमुक्‍त करण्‍यावर भर देण्‍यात आला आहे. या नदीमध्‍ये सांडपाणी प्रकिया न करताच नदीत थेट सोडले जाते. ते रोखणे यावर भर देण्‍यात येणार आहे, तसेच औद्योगिक आस्‍थापनातील पाणी प्रकिया न करताच नदीत जात असल्‍याने त्‍यावरील नियंत्रण आणण्‍याचे काम एम्.आय.डी.सी. आणि एम्.पी.सी.बी.कडून केले जाणार आहे. त्‍यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखण्‍यास साहाय्‍य होणार आहे.

४. ३ नगरपरिषद, २ नगरपंचायत, ‘देहू कॅन्‍टोन्‍मेंट बोर्ड’ आणि काही ग्रामपंचायतीच्‍या परिसरातून ही नदी वहाते. नदी प्रदूषण या टप्‍पा १ च्‍या कामानंतर पूर नियंत्रण टप्‍पा २ आणि टप्‍पा ३ मध्‍ये नदीचा किनारा सुशोभित करण्‍यात येणार आहे अन् भाविकांसाठी घाट बांधण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे हा परिसर पर्यटनस्‍थळ म्‍हणूनही नावारूपाला येण्‍यास साहाय्‍य होणार आहे.