कोल्हापूर – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडप, नगारखाना आणि मनकर्णिका कुंड यांचा आराखडा पुरातत्व विभागाला सादर करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाकडून नियुक्त केलेल्या सल्लागाराकडून तो सिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार अंदाजपत्रकही सिद्ध केले आहे. पुरातत्व विभागाकडून नेमलेल्या सल्लागारांसमवेत ३ बैठका झाल्या आहेत आणि पहाणीही झाली आहे. यासाठी लागणारा निधी देवस्थान व्यवस्थापन समिती व्यय करणार आहे. पावसाळा संपल्यावर हे काम चालू होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. गरुड मंडपाचे काम पूर्णपणे धोकादायक झाले आहे. लोखंडी खांबाने त्याला आधार दिला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता कोणतेही काम करणे शक्य होणार नाही. कोणाचाही धक्का लागल्यास मंडप खाली येऊ शकतो. त्यामुळे यापुढील काळात कोणताही धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे सर्व पुजार्यांना लेखी कळवले आहे.
२. हा मंडप पूर्ण उतरवून नव्याने काम केले जाणार आहे. हे पुष्कळ गुंतागुंतीचे बांधकाम आहे. त्यासाठी राज्यशासनाने पुरातत्व विभागाचे सल्लागारही नेमले आहेत.
३. गरुड मंडपाव्यतीरिक्त इतर ठिकाणी श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्याविषयी पर्याय आल्यास नक्की विचार करू.
४. श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात ‘कॉरिडॉर’ करतांना कोणत्याही व्यावसायिक अथवा व्यापारी यांच्या व्यापार्याची हानी न होता हे काम केले जाईल. सर्वांची योग्य व्यवस्था झाल्यावरच पुढील काम करता येईल. यासाठी सध्या अनेक लोकांची संमती आली असून सध्या ‘माऊली लॉज’च्या भूमीच्या भूसंपादनाचे काम चालू आहे.