सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्हा निवड समितीच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदांच्या भरतीविषयी पात्र उमेदवारांकडून ५ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परीक्षेविषयी शैक्षणिक अहर्ता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याचा कालावधी आणि इतर आवश्यक अटी याविषयीची माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी (www.zpsatara.gov.in ) या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करावेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून प्रस्तुत परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १ सहस्र रुपये, तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क, तसेच माजी सैनिक, अपंग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क क्षमा करण्यात आले आहे.