नूंह येथील हिंसाचाराच्या प्रकरणी २५ रोहिंग्या मुसलमानांना अटक !

रोहिंग्या मुसलमान रहात असलेल्या झोपड्या पाडल्या !

नूंह (हरियाणा) – येथे ३१ जुलै या दिवशी झालेल्या हिंसाचारावरून हरियाणा पोलिसांनी २५ रोहिंग्या मुसलमानांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात २० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वर्ष २०१७ मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे हे रोहिंग्या पलायन करून भारतात आले. भारतातील विविध प्रांतातून त्यांनी नूंह गाठले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

१. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या नूंहमध्ये साधारण २ सहस्र रोहिंग्या मुसलमान रहात आहेत. हिंसाचारामध्ये काही रोहिंग्या मुसलमान सक्रीय झाले असावेत, अशी माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

२. जिल्ह्यातील तवाडूमध्ये पोलिसांनी २५० झोपड्या पाडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने रोहिंग्या मुसलमान रहात होते. या सर्वांचा आधीपासूनच विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग होता, तसेच ३१ जुलैच्या हिंसाचारातही हे सहभागी होते. यामुळे ही कारवाई केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

३. नूंहचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजरानिया यांनी सांगितले की, रोहिंग्या मुसलमानांची शरणार्थी म्हणून असलेली कागदपत्रे आम्ही पहात आहोत. त्यांच्याकडे संयुक्त राष्ट्रांचे ‘शरणार्थी कार्ड’ असल्याचे सांगितले जात आहे. त्याचीही सत्यता पडताळू ! (शरणार्थी कार्ड असो अथवा नसो, ते हिंसाचारात सहभागी असतील, तर त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हायला हवी आणि त्यांच्या मायदेशी त्यांना पाठवले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

शरणार्थी बनून दुसर्‍या देशामध्ये आश्रय घेणारे शरणार्थी त्या देशात हिंसाचार माजवण्याची ही काही नवी गोष्ट नाही. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका येथेही असेच चित्र आहे. अशा ‘गरीब’ मुसलमानांच्या झोपड्या पाडल्यावरून थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी आता चकार शब्दही बोलणार नाहीत, हेही तितकेच खरे !