‘जयप्रभा स्टुडिओ’ वाचवण्यात यशस्वी ! – राजेश क्षीरसागर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्री. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर – कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रश्न गेली वर्षभर प्रलंबित होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने ३ ऑगस्टच्या पत्रान्वये या जागेविषयी निर्णय घेण्याचे २ पर्याय दिले आहेत.  सदर जागेतील प्राचीन जागेच्या संपादनाच्या मोबदल्यात उर्वरित जागेत भूमी मालकास बांधकामास अनुमती देऊन विकास हस्तांतरणीय अधिकार उपलब्ध करून देण्यात यावा, असेही त्यात नमूद आहे. त्यामुळे ‘जयप्रभा स्टुडिओ’ वाचवण्यात आपण यशस्वी झालो आहे, अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘वास्तविक पहाता हा प्रश्न निकाली लागण्याच्या स्थितीत असतांना याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला. भारतरत्न लता मंगेशकर आणि ‘महालक्ष्मी एल्.एल्.पी. फर्म’मध्ये कायदेशीर व्यवहार झाला आहे. अशी सत्य परिस्थिती असतांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपकीर्ती करण्याच्या हेतूने जनता आणि कलाकार यांमध्ये गैरसमज पसरवण्याचा डाव आखला गेला. कलाकारांनी केलेल्या आंदोलनास आपण तात्काळ भेट देऊन या स्टुडिओच्या विकासासाठी मी जनता आणि कलाकार यांच्या समवेत असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यापर्यंत हा विषय पोचवून हा स्टुडिओ वाचवण्यात यश मिळाले आहे.