पुणे – महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य संग्रहालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नर्हे येथील शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ‘शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिबिंबित व्हावेत आणि त्यांच्या विचारांवर आधारित कृती करण्याची ऊर्जा नागरिकांना मिळावी, यासाठी हे आयोजन आहे’, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की,
१. शिवसंग्रहालय भव्य दिव्य आणि अत्याधुनिक संकल्पनेवर आधारित व्हावे, त्यातून शिवरायांचे संपूर्ण जीवन जगासमोर ठेवले जावे, अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत.
२. मुंबईत येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपर्यंतही महाराजांचे कार्य या निमित्ताने पोचेल. महाराजांच्या जीवनाशी निगडित ८८ सहस्र वस्तू राज्यात विविध ठिकाणी आहेत, त्या एकाच ठिकाणी आणण्याचाही प्रयत्न संग्रहालयाच्या निमित्ताने होणार आहे.
३. सार्वजनिक उद़्घोषणा यंत्रणेच्या (पी.ए.एस्.) माध्यमातून प्रतिदिन सकाळी ९.४५ वाजता मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित दिनविशेष आणि त्यांचे विचार प्रसारित करण्यात येणार आहेत.
४. शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित १२ टपाल तिकिटे प्रकाशित करण्यात येणार आहेत. येत्या ९ ऑगस्टला शहाजी महाराजांवर आधारित टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येईल. रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सोने, चांदी आणि तांबे यांची ‘होन’ मुद्रा सिद्ध करण्यात येईल.
५. छत्रपतींची वाघनखे देण्याची विनंती ब्रिटिश म्युझिअमने मान्य केली आहे, जगदंबा तलवारही परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे संस्कारक्षम व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी शिवसृष्टीला भेट द्या ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिवसृष्टीला भेट !
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्याचे संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी शिक्षणसंस्थानी विद्यार्थ्यांना शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आणावे आणि या शिवकार्यात आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. श्री. मुनगंटीवार यांनी आंबेगाव येथील शिवसृष्टीला भेट दिली. या वेळी शिक्षण संस्था आणि शिक्षण मंडळ प्रमुखांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अनिल पवार उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार यांनी संस्थाचालकांशी संवाद साधला आणि विविध संस्थांनी राबवलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, एकविसाव्या शतकात वैचारिक प्रदूषणाचा धोका वाढला असतांना आदर्श जीवनासाठी मार्गदर्शन करणारा शिवरायांचा विचार समाजासमोर मांडणे आवश्यक आहे. हे कार्य शिवसृष्टीच्या माध्यमातून होत आहे. उत्तम समाज घडवण्याचा हा प्रयत्न आहे. विद्यार्थी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आत्मसात करत असतांना त्याला संस्काराचा विचार देणे महत्त्वाचे आहे. शिवरायांच्या विचारावर आधारित समाज घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आवर्जून आणावे, असे आवाहन त्यांनी केले.