|
पालघर – पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक जंजिरे वसई गडाची दुरवस्था झाली आहे. गडाची देखभाल-दुरुस्ती आणि स्वच्छता न झाल्याने तेथील तटबंदी ढासळू शकते. ‘केंद्रीय पुरातत्व विभागाचा स्थानिक विभाग गडाचे संवर्धन करण्यात अपयशी ठरला’, असे दुर्गप्रेमींचे म्हणणे आहे. गडाच्या संवर्धनासाठी दुर्गमित्र संघटना एकवटल्या असून गडाची डागडुजी न झाल्यास आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.
गडावरील तटबंदीच्या दुरुस्तीच्या संदर्भात उपाययोजना न झाल्यास बांधकाम कोसळण्याची शक्यता असल्याची सूचना देणारे ई-मेल १ डिसेंबर २०२२ या दिवशी दुर्गमित्र, अभ्यास, भटकंती वर्ग, इतिहासप्रेमी यांनी केंद्रीय पुरातत्व मुंबई विभागाला पाठवले होते; मात्र यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही. (पुरातत्व विभागाची निष्क्रीयता ! – संपादक)
गडाची झालेली दुरवस्था !१. गडाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूकडील काही बुरुजांची अत्यंत तातडीने स्वच्छता आणि डागडुजी करणे आवश्यक आहे. तटबंदीवर गवत आणि अनावश्यक काटेरी झुडुपे वाढली आहेत. मुख्य बुरुजावर बेसुमार झाडे वाढल्याने तटबंदी आणि बुरुज यांना तडे जाऊन भेगा पडल्या आहेत. यांतील अनेक बुरुज कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. २. घोरपड, साप, विषारी जिवाणू यांचा वावर वाढल्याने येथे पर्यटकांच्या दृष्टीने धोका निर्माण झाला आहे. ३. तटबंदीच्या खालील भागात पाण्याचा निचरा होणारे मार्ग पूर्णपणे बंदिस्त झाल्याने तेथे दलदल वाढत आहे. ४. ‘ऐतिहासिक भुयारी मार्गात अत्यंत धोकादायक पद्धतीने शिरून मार्गक्रमण करावे लागत आहे. धोकादायक बांधकामाचे पुरातत्वीय लेखा परीक्षण करून डागडुजी करणे अत्यंत आवश्यक आहे’, असे निवेदनही ई-मेलद्वारे करण्यात आले आहे. ‘आम्ही पाठवलेल्या पत्राचे महत्त्व तातडीने लक्षात घेऊन आपले राष्ट्रीय वारसास्थळ वाचवावे’, ही आग्रहाची विनंती आहे, असे मत किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख आणि इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी व्यक्त केले. |
संपादकीय भूमिका
|