पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

ठाणे येथील एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे प्रकरण

ठाणे, ५ ऑगस्ट (वार्ता.) – येथील जोशी-बेडकर आणि बी.एन्. बांदोडकर या महाविद्यालयात एन्.सी.सी. (राष्ट्रीय छात्र सेना)च्या विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणप्रकरणी पोलिसांच्या तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मारहाण करणारा तरुण भांडुप येथील महाविद्यालयातील असून तो एन्.सी.सी.चे प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयात येत असल्याचे समोर आले आहे. या मारहाणीच्या घटनेचे चित्रीकरण २६ जुलै या दिवशीचे आहे. एन्.सी.सी.नेही संबंधित तरुणाचे निलंबन केले असून एन्.सी.सी.कडून त्याची चौकशी चालू आहे. या प्रकरणात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांकडून तक्रार प्रविष्ट झाली नसल्याने पोलिसांनी स्वत: तक्रार देऊन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. राजकीय वातावरण चिघळल्यानंतर पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी काही विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, चित्रीकरण करणार्‍या विद्यार्थ्यांचे जबाब घेण्यास चालू केले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.