मुंबई, ५ ऑगस्ट (वार्ता.) – ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. ‘भारतरत्न’ मिळालेल्या व्यक्तीने (सचिन तेंडुलकर यांनी) अशा प्रकारे ‘ऑनलाईन गेमिंग’चे विज्ञापन करणे अयोग्य आहे, असे मत प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत व्यक्त केले. अंतिम आठवडा चर्चेच्या वेळेत ४ ऑगस्ट या दिवशी त्यांनी सभागृहात हे सूत्र उपस्थित केले.
सचिन तेंडुलकर यांनी देशाचे नाव मोठे केले; मात्र त्यांनी ‘पेटीएम् फर्स्ट गेम्स्’ या ‘ऑनलाईन गेमिंग’चे विज्ञापन केले आहे. या प्रकरणी सचिन तेंडुलकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले असल्याचे या वेळी बच्चू कडू यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या आर्थिक लुटीविषयी बच्चू कडू म्हणाले, ‘‘एकाच प्रकारची शस्त्रक्रिया असूनही अनेक रुग्णालयांमध्ये वेगवेगळी पैशांची आकारणी केली जाते. यासाठी कोणते बंधन नाही. ही गरिबांची आर्थिक लूट आहे. आमदार आणि शासकीय अधिकारी यांच्यावरील वैद्यकीय उपचारांचे पैसे सरकार भरते. आमदारांचे वैद्यकीय देयक ५० लाख रुपये असले, तरी किंवा प्रशासकीय अधिकार्यांचे देयक १ कोटी रुपये असले, तरी सरकार पैसे देते; परंतु गरिबांसाठी केवळ ५ लाख रुपयांमध्ये वैद्यकीय देयक दिले जाते. हा भेदभाव आहे.’’