‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडे फ्रान्सच्या दौर्यावर गेले होते. तेव्हा तेथे अत्यंत महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे भारत आणि फ्रान्स यांमधील व्यापार आता रुपयांमध्ये होणार आहे. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर अतिशय चांगला परिणाम होईल. थोडक्यात भारताचा ‘रुपया’ हा आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरला जाईल. भारताच्या आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल समजले पाहिजे. यादृष्टीने केलेला विचारविनिमय येथे दिला आहे.
१. जगाच्या व्यापारामध्ये ‘डॉलर’चे स्थान
सध्या युरोप किंवा अमेरिका यांच्यासमवेत भारत ‘डॉलर’च्या स्वरूपात व्यापार करतो. ‘डॉलर’ (अमेरिकेचे चलन) हे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सर्वाधिक वापरले जाणारे चलन आहे. त्यानंतर थोड्या प्रमाणात ‘युरो’ (युरोपीय युनियनचे चलन) वापरले जाते. अतिशय थोड्या प्रमाणात चीनचे चलन ‘युआन’ वापरले जाते आणि त्यानंतर थोड्या फार प्रमाणात अन्य चलने वापरली जातात; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर चलन म्हणून डॉलरचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारतासह सर्वच देशांना त्यांच्याकडे डॉलर्सचा मोठा साठा ठेवावा लागतो.
२. रुपया, डॉलर आणि अन्य चलने यांची तुलना
रुपया हे ‘सेमीकन्वर्टेबेल आहे, म्हणजे कुणी कितीही रुपयांची देवाणघेवाण करू शकत नाही. त्यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे. रुपया हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील चलन आहे. त्यामुळे कुणीही रुपयांच्या मोबदल्यात कितीही डॉलर्स खरेदी करू शकतो आणि विकू शकतो. रुपयाचे मूल्य बाजार ठरवतो. सध्या १ डॉलर विकत घेण्यासाठी ८२ ते ८३ रुपये घ्यावे लागतात. १ युआन घेण्यासाठी १६ ते १७ रुपये लागतात. एका ब्रिटीश पौंडसाठी ३० ते ४० रुपये लागतात. हे मूल्य बाजार ठरवतो. त्यामुळे सर्व जगाचा भर डॉलरवर आहे. रुपया हाही आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरला जावा, यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.
३. रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे लाभ !
अ. सध्या भारताचा व्यापार (आयात-निर्यात) वाढला आहे. त्यामुळे अनेक देश भारताशी रुपयांमध्ये व्यापार करू लागले आहेत, उदा. भारत-भूतान, भारत-नेपाळ, भारत-बांगलादेश आणि श्रीलंका येथे रुपयांमध्येच व्यापार चालतो. या पार्श्वभूमीवर आता १२ देशांनी रुपयांमध्ये ‘पेमेंट’ स्वीकारण्यास प्रारंभ केला आहे. त्यात ‘रशिया’ हा महत्त्वाचा देश आहे. भारताने रशियाकडून घेतलेल्या कच्च्या तेलाचे सर्वाधिक मूल्य रुपयांमध्ये दिले आहे. आता फ्रान्सनेही रुपयाला ‘चलन’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये रहाणारे भारतीय तेथे रुपयांमध्ये व्यवहार करू शकतील. फ्रान्समधून भारतात येणारे पर्यटकही फ्रेंच चलन रुपयांमध्ये त्वरित रूपांतरित करू शकतील.
आ. विविध देशांमध्ये (अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोप) स्थायिक झालेेले ३-४ कोटी भारतीय सहस्रो कोटी रुपये भारतात पाठवतात. २-३ कोटी भारतीय अन्य देशांमध्ये पर्यटक म्हणून जातात. २-३ लाख विद्यार्थी विदेशात शिक्षण घेतात. त्यांना भारतीय रुपये त्या त्या देशांच्या चलनांमध्ये परावर्तित करावे लागतात. रुपयाचे आंतरराष्ट्रीय चलन झाल्यावर त्यांनाही लाभ होणार आहे. रुपया काही प्रमाणात अमेरिकेत, युरोपमध्ये विशेषत: इंग्लंडमध्ये वापरण्यास प्रारंभ झाला आहे. भारताचे पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेले होते. तेथेही ३० ते ४० लाखांहून अधिक भारतीय रहातात. त्यांनाही रुपया मुक्तपणे परावर्तित करता येईल. आधी तेथील चलनात रुपया परावर्तित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘कमिशन’ द्यावे लागत होते. आता पर्यटक, अनिवासी भारतीय आणि विद्यार्थी यांना मूल्यवान डॉलर्स विकत घ्यावे लागणार नाहीत. तसेच डॉलर्सचा साठाही करून ठेवावा लागणार नाही. ही अत्यंत चांगली गोेष्ट घडणार आहे.
४. रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्यासाठी अर्थव्यवस्था सबळ होणे आवश्यक !
ज्याप्रमाणे कुणी कितीही डॉलर्स घेऊ शकतो किंवा विकू शकतो, तसे रुपयाचे का करत नाही ? कारण सध्या भारताची आर्थिक शक्ती ही जगाच्या २ टक्के एवढीच आहे. तज्ञांच्या मते भारताचा ‘जीडीपी’ (सकल देशांतर्गत उत्पादन) जगाच्या १५ ते २० टक्के पोचणे आवश्यक आहे. सध्या एवढा ‘जीडीपी’ चीन, अमेरिका आणि युरोपीयन युनियन यांचा आहे. तेवढा ‘जीडीपी’ भारताचा झाला, तर भारत रुपयाला संपूर्णपणे रूपांतरित करू शकतो. तोपर्यंत भारताला काही नियंत्रण ठेवावे लागत आहे. ‘केवायसी’ या प्रकारात आपले आधारकार्ड, पॅनकार्ड जोडावे लागते. एवढेच नाही, तर भारतात ज्या आर्थिक संस्था पैसे गुंतवतात, त्यांनाही ओळख द्यावी लागते. जेव्हा रुपया हे पुष्कळ प्रमाणात वापरले जाणारे आंतरराष्ट्रीय चलन होईल, तेव्हा अनेक लोक रुपया घेऊन ठेवतील. त्यातून भारतीय रुपयाचे मूल्य वाढेल. येणार्या काळात रुपयाचा वापर अधिक होण्यासाठी भारताची आयात-निर्यात आणि अर्थव्यवस्था यांमध्ये वृद्धी होणे आवश्यक आहे.
५. गुंतवणुकीचा अधिक परतावा आणि लाभ या दृष्टीने जगात भारताने विश्वास निर्माण करणे आवश्यक !
रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण हे सरकारने उचललेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे जगाला भारत सरकार, अर्थव्यवस्था, पद्धती यांविषयी आत्मविश्वास वाटतो, ही आपल्या देशाला लाभलेली मोठी देणगी आहे. रुपयांच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा वेग वाढवायला हवा. त्यामुळे भारताला अल्प किमतीत आंतरराष्ट्रीय कर्ज घेता येईल आणि त्याचा अधिक लाभ होईल. जगभरातील लोकांसाठी गुंतवणुकीचा अधिक परतावा आणि लाभ देणारे सुरक्षित साधन, म्हणजे अमेरिकी डॉलर अन् सोने आहे. हा विश्वास खरेतर तेथील आर्थिक, राजकीय, सामाजिक, न्याय, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि नेतृत्व अशा बलवान व्यवस्था अन् संस्था यांवर असतो. हा विश्वास भारताला संपूर्ण जगभरात निर्माण करावा लागेल. तेव्हा जगातील सर्व लोक भारतीय रुपयाची मागणी करतील.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.