गंगा माहात्‍म्‍य

१. ‘गमयति भगवत्‍पदमिति गङ्‍गा ।’
अर्थ : स्नान करणार्‍याला भगवत् पदापर्यंत पोचवते ती गंगा !

‘गम्‍यते प्राप्‍यते मोक्षार्थिभिरिति गङ्‍गा ।’  शब्‍दकल्‍पद्रुम
अर्थ : मुमुक्षु जिच्‍याकडे जातात, ती गंगा !

२. देवी भागवतात असलेले गंगेचे ध्‍यान !

‘चंद्रकिरणांच्‍या प्रभेने युक्‍त असलेल्‍या, भगवती गंगेच्‍या शिरावर शुभ्र छत्र आहे आणि शुभ्र वस्‍त्र धारण केलेल्‍या, मोत्‍यांच्‍या दागिन्‍यांनी शोभायमान आहे. भगवती गंगेच्‍या एका हातात शुभ्र कमळ आहे. दुसर्‍या हातात रत्नकलश असून बाकी दोन हात भक्‍तांना अभय आणि वर प्रदान करणारे आहेत. अशी चतुर्भुज आणि त्रिनेत्रधारी गंगा.’

३. उगमापाशी या गंगेला ‘भागिरथी’ म्‍हणतात. तेथून गंगा भूमीवर उतरते. तिचे अनेक प्रवाह होतात. प्रत्‍येक प्रवाहाला वेगळे नाव आहे. ‘जान्‍हवी आणि अलकनंदा’ हे दोन प्रवाह ‘देवप्रयागाला’ मिळतात. नंतर ‘विष्‍णु गंगा, धौली गंगा’ हे प्रवाह मिळतात. विष्‍णुप्रयागानंतर हा प्रवाह ‘अलकनंदा’ नावाने ओळखला जातो. पुढे ‘मंदाकिनी, पिडर गंगा’ गंगेला मिळतात. उगमापासून गंगेचे मुख्‍य दोन प्रवाह असून पूर्वेला मंदाकिनी आणि पश्‍चिमेला भागिरथी असे वहातात. या दोन प्रवाहांचा संगम होतो. आता ती गंगा होते. कनखलजवळ ती सपाटीवर उतरते, ते तीर्थ गंगाद्वार.

४. भगीरथाने कैलासावर तपस्‍या केली आणि स्‍वर्गातून गंगेला भूतलावर आणले. भगीरथाने स्‍वर्गातून गंगेला भूतलावर आणण्‍याकरता कैलासावर तप केले. पितरांच्‍या मुक्‍तीकरता त्‍याने गंगा भूलोकी आणली.

५. ‘ज्‍येष्‍ठ मास, शुक्‍ल पक्ष, दशमी, मंगळवार आणि हस्‍तनक्षत्र’ या योगावर गंगा भूलोकी आली.

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०१८)