नूंह (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षकाचे स्थानांतर

पोलीस अधीक्षक वरुण सिंगला

नूंह (हरियाणा) – येथील पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांचे स्थानांतर करण्यात आले असून त्यांच्या जागी नरेंद्र बिजारनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूंह येथे ३१ जुलै या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी वरुण सिंगला रजेवर होते.

१. नूंह येथील हिंसाचारानंतर शेजारील जिल्ह्यांमध्ये अद्यापही हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत. पानिपतमधील धमीजा कॉलनीत ३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी मुसलमानांची दुकाने आणि २ वाहने यांवर दगडफेक केली.

२. ४ ऑगस्ट या दिवशी येथील मुसलमानांनी घरातच नमाजपठण केले. पोलिसांनी त्यांना मशिदीमध्ये न जाण्याचे आवाहन केले होते. सर्व मशिदींबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

३. नूंह येथील हिंसाचारात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गृहरक्षक दलाचे गुरुसेवक आणि नीरज हे सैनिक, तसेच शक्ती सिंह, अभिषेक, प्रदीप शर्मा आणि अन्य २ व्यक्ती यांचा समावेश आहे. पोलिसांनी एकूण ९३ गुन्हे नोंदवले असून १८६ जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच ७८ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी  रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांंच्या अनधिकृत झोपड्यांवर केली कारवाई !

नूंहच्या तावडू भागात पोलिसांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमानांंच्या अवैध झोपड्यांवर कारवाई करत त्या पाडल्या. नूंह येथील हिंसाचारात येथील रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचा समावेश होता, असे पोलिसांना आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (जर नूंह येथे हिंसाचार झाला नसता, तर सरकारने या झोपड्यांवर कारवाई केली नसती, असेच यातून लक्षात येते ! या झोपड्या येथे उभारण्यात येईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? देशात अशा प्रकारे किती ठिकाणी हे घुसखोर रहात आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होणार आहे का ? – संपादक) अनुमाने २०० हून अधिक झोपड्या पाडण्यात आल्या. जवळपास ४ घंटे ही कारवाई करण्यात येत होती. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या झोपड्या सरकारी भूमीवर बांधण्यात आल्या होत्या.