संबंधित अधिकार्‍यांची ‘एस्.आय.टी.’द्वारे चौकशी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करू ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

लातूर येथील बहुजन कल्‍याण विभागातील अपव्‍यवहाराचे प्रकरण

मुंबई, ४ ऑगस्‍ट (वार्ता.) – लातूर येथील इतर मागास बहुजन कल्‍याण विभागात पदस्‍थापना देण्‍यात आलेल्‍या एका अधिकार्‍याने अपव्‍यवहार केल्‍यामुळे वर्ष २०१९ मध्‍ये विशेष अन्‍वेषण पथकाद्वारे (एस्.आय.टी.द्वारे) त्‍यांची चौकशी पूर्ण होणे आवश्‍यक होते; पण त्‍यात दिरंगाई झाली आहे. या अधिकार्‍यांची ३१ डिसेंबरपर्यंत चौकशी करून ते दोषी आढळले, तर त्‍यांच्‍यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी ४ ऑगस्‍ट या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्‍नोत्तरात दिली. सदस्‍य आमश्‍या पाडवी यांनी हा प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

चौकशीला झालेल्‍या दिरंगाईसंदर्भात विचारलेल्‍या प्रश्‍नांवर इतर मागास बहुजन कल्‍याण मंत्री अतुल सावे म्‍हणाले की, ‘एस्.आय.टी’चा चौकशी अहवाल गृहविभागाकडून आलेला नाही. त्‍यांच्‍याकडून अहवाल मागवण्‍यात येईल’; मात्र त्‍यांना सदस्‍यांच्‍या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्‍यामुळे अजित पवार यांनी हस्‍तक्षेप करून वरील खुलासा केला.