पुण्यातील पिंपरी शहरामध्ये सध्या ३९० अनधिकृत, तर ५३३ अधिकृत असे एकूण ९२३ ‘मोबाईल टॉवर’ (भ्रमणभाष मनोरे) आहेत. ते पाडण्याविषयी न्यायालयाच्या निर्देशामुळे पालिकेला कोणतीही कारवाई करता येत नाही; परंतु हेच अनधिकृत ‘टॉवर’ आता निश्चित दंड भरून अधिकृत करता येऊ शकणार आहेत. अनधिकृत ‘टॉवर’ला आर्थिक दंड केला, तरी त्यांच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आता किमान नवीन ‘टॉवर्स’ गाव तथा शहर यांपासून दूर उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सामान्य नागरिकांचा मालमत्ता कर थकला, तर तत्परतेने दंडआकारणी केली जाते; परंतु अशा मोठ्या आस्थापनांविषयी मात्र दंडआकारणी करण्यास प्रशासनाकडून बोटचेपी भूमिका घेण्यात येते. या टॉवरमधून लहरी किती प्रमाणात निघतात ? आणि त्याचा मानवी जीवावर किंवा पशूपक्ष्यांवर काय परिणाम होतो ? याकडेही कुणाचे लक्ष नाही. ‘मोबाईल टॉवर’ उभारण्यासाठी दूरसंचार विभागाकडून काही नियम घालून दिले आहेत; पण ते उभारतांना हे नियम धाब्यावर बसवले जातात. हे जनतेच्या आरोग्याशी खेळल्यासारखे नाही का ?
मोबाईल लहरींच्या अधिक संपर्कात आल्यास कर्करोग, दृष्टी अल्प होणे, चिडचिडेपणा, नकारात्मक विचार, सतत डोके दुखणे, अशक्तपणा, थकवा येणे, लहान मुलांत विकृती निर्माण होणे, असे ‘रेडिएशन’चे दीर्घकालीन विकार होतात. याचा परिणाम शरिरावर तात्काळ होत नाही. यामुळे ‘टॉवर’चा ‘आपल्यावर काही परिणाम होतो का ?’, याचेही भान या टॉवरजवळ रहिवास करणार्यांना नसते. त्यातून सतत येणार्या लहरींमुळे पक्षांच्या प्रजनन क्रियेवर परिणाम झाला आहे. पशूपक्षी, मधमाशी आणि फुलपाखरे यांच्या संख्येतही मोठ्या संख्येने घट होत आहे. विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा दुष्परिणाम म्हणजे पृथ्वीवर वाढलेले प्रदूषण आहे. त्यानेच पृथ्वीचा पर्यायाने मनुष्याचा विनाश होत आहे. विज्ञानाने जेवढ्या सुखसुविधा दिल्या आहेत, तेवढेच याचे दुष्परिणामही जगाला भोगावे लागत आहेत. ‘विज्ञानाच्या घोड्याला आत्मज्ञानाचा (सद़्सद्विवेकबुद्धीचा) लगाम घातला पाहिजे; तरच मनुष्यजीवनाची वाटचाल सुखकर होईल’, असे मत आचार्य विनोबा भावे यांनी व्यक्त केले होते, ते किती योग्य आहे, याची प्रचीती आज आपल्याला येत आहे. यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणेही क्रमप्राप्त ठरते.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे