सोलापूर येथे पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थकांवर लाठीमार केल्याचे प्रकरण
मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) – सोलापूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या समर्थकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना घायाळ केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलीस अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी ३ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली. त्या वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल’, असे आश्वासन दिले.
हे सूत्र मांडतांना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की, २ ऑगस्ट या दिवशी पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आंदोलन करण्याची अनुमती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते; मात्र पोलिसांनी अनुमती नाकारली.
(सौजन्य : Zee 24 Taas)
३ ऑगस्ट या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सर्व हिंदुत्वनिष्ठ जमले असता त्यातील काही हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी कह्यात घेऊन फौजदारी कारवाई करण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात नेले. यामागील कारण विचारण्यासाठी इतर हिंदुत्वनिष्ठ पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तेथील पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी त्यांच्यावर लाठीमार केला. मुळात हिंदुत्वनिष्ठांनी कोणतीही हुज्जत घातली नाही ना कुठला अनुचित प्रकार केला ! तरीही पोलिसांच्या लाठीमारात काही हिंदुत्वनिष्ठांची डोकी फुटून ते घायाळ झाले आहेत, तसेच येथे आलेल्या नगराध्यक्षांची कॉलरही पोलिसांनी पकडली. त्यामुळे ‘लाठीमार करणार्या पोलीस अधिकार्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी केली.