१. फलक लिहिण्याच्या सेवेला आरंभ करण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना भावपूर्ण प्रार्थना करणे
‘जून २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची माहिती देणारा फलक लिहिण्याची सेवा मला करायची होती. फलक लिहिण्यापूर्वी मी सच्चिदानंद गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) प्रार्थना केली, ‘हे गुरुदेव, तुम्हीच माझ्याकडून हा फलक लिहून घ्या. या फलकावरील लेखन करणारे आणि लेखन करून घेणारे, कर्तेकरविते तुम्हीच आहात. भगवंता, हा हात तुमचा आहे. हे नेत्र तुमचे आहेत. तुम्हाला जसे अपेक्षित आहे, तसे फलकावर भावपूर्ण लेखन करून घ्या.’
२. प्रार्थना केल्यावर फलक लिहून सिद्धच असून त्यावरून केवळ खडू फिरवावा लागत असल्याचे रामानंद परब यांना जाणवणे अन् त्यांना त्यांच्या जागी गुरुदेवच दिसणे
गुरुदेवांना प्रार्थना करून डोळे उघडल्यावर फलक सिद्धच असून त्यावरील प्रत्येक ओळीचा रंग, आकार आणि त्यांची रचना मला दिसली. ‘मी फक्त त्यांच्यावरून खडू फिरवत आहे’, असे मला जाणवले. मला माझ्या हाताच्या जागी गुरुदेवांचा हात दिसत होता. ‘माझ्या जागी गुरुदेवच आहेत’, असे फलक लिहून पूर्ण होईपर्यंत मला दिसत होते.
३. फलक कोणत्याही वेदना न होता केवळ ३० मिनिटांत लिहून पूर्ण होणे आणि ही सेवा प्रत्यक्ष गुरुदेवांनी केल्याचे ‘याची देही याची डोळा’ अनुभवणे
एरव्ही फलक लिहितांना प्राणशक्ती न्यून असल्यामुळे बोटांतून खडू १५ ते २० वेळा पडायचा. फलक लिहून झाल्यावर बोटांमध्ये वेदना व्हायच्या. फलक लिहायला दीड तास कालावधी लागायचा; पण हा फलक केवळ ३० मिनिटांत लिहून पूर्ण झाला, तसेच माझ्या हातातून खडू एकदाही पडला नाही. ‘मी बोटांत खडू पकडला आहे’, याची मला जाणीवही झाली नाही. ‘ही सेवा प्रत्यक्ष गुरुदेवांनी केली आहे’, हे ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्याची संधी मला मिळाली. ‘हे गुरुदेवा, अशीच कृपादृष्टी माझ्यावर अखंड राहू दे’, ही आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.
– श्री. रामानंद परब (वय ४० वर्षे, अध्यात्मिक स्तर ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |