कॅनडामध्ये प्रत्येक सिगारेटवर लिहिली जाणार आरोग्याला हानीकारक असल्याची चेतावणी

प्रतिकात्मक छायाचित्र

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये आता प्रत्येक सिगारेटवर ती आरोग्यासाठी हानीकारक असल्याची चेतावणी छापण्यात येणार आहे. ‘सिगारेट ओढल्यामुळे नपुंसकता आणि कर्करोग होतो’, असे यावर छापण्यात येणार आहे. तसेच सिगारेटच्या प्रत्येक झुरक्यामध्ये विष आहे’, असेही लिहिण्यात येणार आहे. वर्ष २०२५ पासून याची कार्यवाही होणार आहे.

१. कॅनडा सरकारच्या अभ्यासात लक्षात आले की, जे लोक एक सिगारेट खरेदी करून ओढतात, त्यांना सिगारेटच्या पाकिटावर लिहिण्यात आलेल्या आरोग्यविषयक सूचनेचा उपयोग होत नाही. यामुळेच प्रत्येक सिगारेटवर चेतावणी लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला.

२. वर्ष २००० मध्ये सर्वप्रथम सिगारेटच्या पाकिटावर आरोग्यविषयक सूचना लिहिण्यास प्रारंभ झाला होता. यानंतर गेल्या २ दशकांत कॅनडामध्ये सिगारेट ओढणार्‍यांच्या संख्येत घट झाली. असे असले, तरी कॅनडामध्ये प्रतिवर्ष ४८ सहस्र लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने होणार्‍या आजारांमुळे होतो. देशाच्या आरोग्याच्या अर्थसंकल्पातील अधिक पैसा तंबाखूमुळे होणार्‍या आजारांच्या उपचारांवर होत आहे. (एकीकडे महसुलासाठी सिगारेटच्या विक्रीला अनुमती द्यायची आणि दुसरीकडे त्याच्यामुळे होणार्‍या आजारावर पैसे खर्च करायचे, याला शहाणपण म्हणत नाहीत ! – संपादक)

३. कॅनडा सरकारचे लक्ष्य वर्ष २०३५ पर्यंत देशातील तंबाखू सेवन करणार्‍यांची संख्या ५ टक्क्यांपर्यंत आणण्याचे आहे. ही संख्या २० लाख असणार आहे. सध्या कॅनडामध्ये १३ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात.

संपादकीय भूमिका

  • जे व्यसनी असतात, त्यांना हानीविषयी कितीही माहिती दिली, तरी ते त्याकडे दुर्लक्ष करून सिगारेटचे सेवन करतात. त्यामुळे लोकांची मूळ वृत्ती पालटण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! तसेच जर ‘लोकांनी सिगारेट ओढू नये’, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने तिच्या उत्पादन आणि विक्री यांवरच बंदी घातली पाहिजे !