रशियाने युक्रेनवरील धान्य निर्यातीच्या प्रमुख मार्गावर केले आक्रमण !

गहू निर्यात करण्यात अग्रेसर असलेल्या युक्रेनच्या बंदरावर झालेल्या आक्रमणामुळे गव्हाचे मूल्य ४ टक्क्यांनी वाढले !

कीव्ह (युक्रेन) – रशियाने युक्रेनमधील डॅन्यूब नदीवर असलेल्या ‘इज्माइल’ नावाच्या बंदरावर आक्रमण केले. येथील धान्याचे एक कोठार नष्ट करण्यात आल्याने धान्याची जागतिक स्तरावरील किंमत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे अमेरिकेतील गव्हाचे मूल्य ४ टक्क्यांनी वाढले आहे. युक्रेन जगभरातील अनेक देशांना धान्य निर्यात करतो. त्याच्या धान्यावर कोट्यवधी लोकांचे पोट भरते.

ओडेसा क्षेत्रात असलेल्या या बंदरावरून मोठ्या प्रमाणात धान्य निर्यात केले जात असल्याने रशियाने त्याच्यावरच आक्रमण केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. गेल्या मासात काळ्या समुद्रावरून युक्रेनच्या धान्याच्या निर्यातीचा मार्ग रशियाने आक्रमण करून बंद पाडला होता. त्यानंतर डॅन्यूब नदीचा मार्ग निर्यातीचा प्रमुख पर्यायी मार्ग होता. आता त्यावरही आक्रमण करण्यात आले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी म्हटले की, दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. रशियन आतंकवादी आमची बंदरे, धान्य आणि जागतिक अन्न सुरक्षा यांवर पुन्हा आक्रमण करत आहेत.