दूध आणि दुग्‍धजन्‍य पदार्थ : त्‍याचे लाभ, समज अन् गैरसमज

बरेच पालक स्‍वतःच्‍या मुलांविषयी ‘डॉक्‍टर बघा ना, हा दूधच पित नाही. दूध प्‍यायले नाही, तर याला ‘कॅल्‍शियम’ कसे मिळणार ? याची हाडे मजबूत कशी होणार ? दात कसे मजबूत होणार ?’ अशा असंख्‍य काळजीचे विचार आणि तक्रारी घेऊन येतात. प्रारंभीला मुले दूध पित असतात. कालांतराने हळूहळू दूध पिण्‍याचे बंद करतात. ‘नीट जेवत नाहीत’, अशीही तक्रार असते. अशा वेळी ‘काही दिवस दूध देऊ नका’, असे पालकांना सांगावे लागते. याचे कारण असे की, कोणत्‍या प्रकारचे दूध मुले घेत आहेत ? किती प्रमाणात घेत आहेत ? ते त्‍याला नीट पचते आहे का ? हा भाग लक्षात घेतला जात नाही आणि मग मुलांना मारून मुटकून, बळजोरीने दूध प्‍यायला दिले जाते. ते दूध पचण्‍याऐवजी मुलांमध्‍ये अपचनच घडवून आणते. आयुर्वेदानुसार कोणतेही पदार्थ जर आपण योग्‍य रितीने पचवू शकत असू, तर त्‍याचे चांगले परिणाम शरिरावर दिसून येतात. हाच नियम दुधाविषयीही लागू होतो. आपण कोणत्‍या प्रदेशात रहातो, म्‍हणजे कोरडे हवामान असलेला प्रदेश असू दे किंवा दमट हवामान असलेला प्रदेश असू दे, यानुसारही आपण किती आणि कसे दूध घेतले पाहिजे ? हे समजून घेणे आवश्‍यक आहे. आजच्‍या लेखामध्‍ये आपण दूध आणि दुग्‍धजन्‍य पदार्थ यांविषयी जाणून घेणार आहोत.

१. दूध

अ. दुधाचे गुणधर्म : दूध हे चवीला गोड, शक्‍ती वाढवणारे, आपल्‍या शरिरात असणार्‍या धातूंची वाढ करणारे, वात-पित्त न्‍यून करणारे, कफ वाढवणारे, पचायला जड आणि थंड आहे. दुधामध्‍ये गायीचे दूध सर्वश्रेष्‍ठ मानलेले आहे. म्‍हशीचे दूध हे गायीच्‍या दुधापेक्षा पचायला अधिक जड आणि थंड आहे. तेव्‍हा दूध प्‍यायचे झाल्‍यास ते देशी गायीचे प्‍यावे. गायीचे दूध हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पथ्‍यकारक असते.

आ. कोरड्या हवामानात रहाणारे लोक दूध सहज पचवू शकतात. दमट हवामानात रहाणार्‍या लोकांनी दूध प्‍यायल्‍यास ते पचायला वेळ लागतो.

इ. दूध प्‍यायल्‍यानंतर २-३ घंटे काही खाऊ नये. दूधासह फळे खाऊ नयेत.

ई. रात्रीचे दूध प्‍यायचे झाल्‍यास रात्रीचे जेवण पचल्‍यानंतर दूध घेतले, तर चालते; पण जेवण उशिरा झाले आहे आणि झोपतांना दूध प्‍यायले, तर ते दूध पचणार नाही.

उ. दूध कधीही कच्‍चे वापरू नये. ते पचायला अधिकच जड असते. सध्‍या तरुणांमध्‍ये ‘कोल्‍ड (थंड) कॉफी’ पिण्‍याचे प्रमाण आढळून येते. ही कॉफी दुधाची पिशवी कापून, तसेच नीरसे (कच्‍चे) दूध मिक्‍सरमध्‍ये ओतून बनवली जाते. अशी कॉफी वारंवार प्‍यायल्‍यास आरोग्‍याच्‍या तक्रारी निर्माण केल्‍याविना रहात नाही.

ऊ. दूध फार तापवले असता तेही पचायला जडच असते. म्‍हणून बासुंदी, रबडी यांसारखे मिष्‍टान्‍न पचायला अधिकच जड असतात.

ए. आपण रहातो, त्‍या स्‍थानिक ठिकाणी गवळी बघून देशी गायीचे शुद्ध दूध मिळेल, असे बघावे. भेसळयुक्‍त दुधाने लाभ होण्‍याऐवजी त्‍याचे तोटेच अधिक बघायला मिळतात. गायीचे दूध उपलब्‍ध होत नसेल, तर म्‍हशीचे दूध पाणी घालून आणि त्‍यात थोडी सुंठ अन् हळद घालून प्‍यायल्‍यास ते दूध योग्‍य रितीने पचेल.

ऐ. ‘भरपूर दूध प्‍यायल्‍यास पुष्‍कळ कॅल्‍शियम मिळते’, हा अपसमज आपल्‍या मनातून पालकांनी काढावा. दूध हे शुद्ध असेल आणि मुलांना योग्‍य रितीने पचत असेल, तरच त्‍याचा लाभ दिसून येतो. जर मुलांना दूध पचत नसेल, तर कॅल्‍शियमचा स्रोत असलेले अन्‍य अन्‍नपदार्थ मुलांना खायला देऊ शकतो. जसे की, शेवगा, नाचणी, बदाम, सुके अंजीर, तीळ, इत्‍यादी.

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

२. दही

अ. दही हेही पचायला जड; पण उष्‍ण गुणधर्माचे आहे. दही जेवणात रुची उत्‍पन्‍न करणारे अन् कफ-पित्त वाढवणारे आहे.

आ. रात्री दही कधीच खाऊ नये. ते खायचे झाल्‍यास दिवसा खावे; पण वसंत ऋतू, उन्‍हाळा आणि शरद ऋतू यांमध्‍ये दिवसाही दही खाऊ नये.

इ. दही कधीही गरम करू नये. अर्धवट विरजलेले दहीही खाऊ नये.

ई. वरील नियम न पाळता दही खाल्‍ल्‍यास ते विविध त्‍वचा विकार निर्माण करते.

३. ताक

अ. ताक हे पचायला हलके, वात-कफ न्‍यून करणारे आणि पचनशक्‍ती वाढवणारे आहे.

आ. दह्यावर घुसळण्‍याचा संस्‍कार झाला असल्‍याने ताकाचे गुणधर्म दह्यापेक्षा निराळे आहेत.

इ. पचनाच्‍या तक्रारी असल्‍यास ताकामध्‍ये थोडा हिंग, जिरेपूड आणि काळे मीठ किंवा सैंधव मीठ घालून प्‍यायल्‍यासआराम मिळतो.

४. लोणी

अ. ताजे लोणी हे गुणधर्माने थंड असून शक्‍ती प्रदान करणारे आणि पचनशक्‍ती वाढवणारे आहे. आधुनिक शास्‍त्रानुसार लोणी आणि तूप यांमध्‍ये चरबीयुक्‍त पदार्थ जरी असले, तरी योग्‍य प्रमाणात घेतल्‍यास ते आरोग्‍यासाठी हितकर असतात.

आ. प्रतिदिन एक चमचा लोणी खाल्‍ल्‍याने हातापायांची आग होणे, पित्त वाढणे या तक्रारी न्‍यून होतात. पौगंडावस्‍थेतील मुलांना लोणी आणि साखर दिल्‍यास त्‍यांचे वजन योग्‍य प्रमाणात वाढून त्‍यांचा बांधा उत्तम होतो. लोण्‍यामुळे वजन वाढून शरीर पुष्‍ट (चांगले) होते आणि हाडे बळकट होतात.

इ. बाजारात मिळणारे लोणी भेसळयुक्‍त असल्‍याने ते आरोग्‍यासाठी घातक ठरते. तसेच बाजारात मिळणारे लोणी हे न तापवलेल्‍या दुधाच्‍या सायीपासून सिद्ध केलेले असल्‍याने ते पचायला जड असते. त्‍यामुळे घरी काढलेले ताजे लोणीच वापरावे.

ई. बाजारात बटरच्‍या (लोणी) नावाखाली ‘मार्जरीन’ (Margarine) सारखा आरोग्‍यास घातक पदार्थ विकला जातो. लोण्‍याच्‍या तुलनेत हा अतिशय स्‍वस्‍त असल्‍याने उपाहारगृहामध्‍ये याचाच वापर अधिक प्रमाणात होतो. यामुळे ‘कोलेस्‍ट्रॉल’ (रक्‍तातील एक घटक) वाढणे, हृदयविकार आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार होण्‍याची शक्‍यता असते.

५. तूप

अ. तूप हे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने अतिशय उत्तम आहे. ते बुद्धी, स्‍मृती, पचनशक्‍ती वाढवणारे, त्‍वचा तजेलदार बनवणारे, लहान मूल आणि वयोवृद्ध यांना शक्‍ती प्रदान करणारे असे आहे.

आ. आधुनिकदृष्‍ट्या तुपामध्‍ये जरी संतृप्‍त चरबी असली, तरी प्रतिदिनच्‍या आहारात २ चमचे तूप असणे आरोग्‍यकारकच आहे.

इ. तूप काढण्‍याच्‍या अनेकविध पद्धती आहेत. त्‍यांपैकी बहुतांश गृहिणी या साय साठवून मग विरजण लावून तूप काढतात. ८ ते १५ दिवस प्रतिदिन साय काढून ती शीतकपाटात ठेवली जाते. कधी तरी ती कडूही होते. अशा सायीपासून केलेले तूप आरोग्‍यास हितकारक नाही. सायीला प्रारंभीपासूनच विरजण घालून त्‍यात प्रतिदिन साय घालावी. विरजण लागल्‍यामुळे साय खराब होणार नाही आणि तूपही चांगल्‍या पद्धतीचे मिळेल. असे घरी काढलेले तूप प्रतिदिन २-३ चमचे आहारात असावे.

ई. भेसळयुक्‍त तूप, वनस्‍पती तूप हे आरोग्‍यास हानीकारक आहे. तूपामध्‍ये देशी गायीचे तूप सर्वश्रेष्‍ठ आहे.

उ. रात्री झोपतांना कोमट पाण्‍यासह एक चमचा साजूक तूप घेतल्‍यास पोट साफ होते.

– वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर, पुणे. (३१.७.२०२३)


रात्री झोपतांना बेंबीत तुपाचे काही थेंब घातल्‍यास त्‍याचे होणारे लाभ

१. नितळ त्‍वचेसाठी तुपाचे योगदान मोठे आहे. त्‍यामुळे बेंबीमध्‍ये तूप घातल्‍याने शरिरातील अतिरिक्‍त उष्‍णता बाहेर पडण्‍यास साहाय्‍य होते आणि परिणामी चेहर्‍यावर दिसणारे फोड, पिंपल हेसुद्धा दूर होतात. अनेकदा खाण्‍यात काही आंबट पदार्थ आल्‍याने सुद्धा हा त्रास जाणवतो. अशा वेळी तुपाने शरिरातील टाकाऊ पदार्थ बाहेर फेकण्‍यास साहाय्‍य होते आणि त्‍याचा एकूणच परिणाम आरोग्‍यासह त्‍वचेवरही दिसून येऊ शकतो.

२. बेंबी हा शरिराचा केंद्रबिंदू असल्‍याने तेथे अन्‍य अवयवांना जोडून ठेवणारे बिंदूदाबनाचे अनेक बिंदू (अ‍ॅक्‍युप्रेशर पॉईंट) असतात. त्‍यामुळे बेंबीमध्‍ये काही थेंब तूप टाकून मसाज केल्‍यास सांधेदुखीचा त्रासही दूर होऊ शकतो.

३. त्‍वचेप्रमाणेच केसाला सुद्धा तुपाचे लाभ मिळाल्‍याने अकाली केस पांढरे होणे किंवा अत्‍यंत रुक्ष होणे यांसारख्‍या समस्‍या दूर होण्‍यास साहाय्‍य होते.

४. बेंबीमध्‍ये तूप घातल्‍याने पोटदुखी आणि ओटीपोटात होणार्‍या वेदना न्‍यून होण्‍यास साहाय्‍य होते. किंचित् ओवा पावडर वा बारीक ओव्‍याचे दाणे तुपात मिसळून वापरू शकतो. यामुळे पटकन आराम मिळतो. मासिक पाळीत होणार्‍या वेदना दूर करण्‍यासाठी तुपाचा हा उपाय रामबाण होऊ शकतो. यासाठी काही थेंब तूप बेंबीसह आपल्‍या ओटीपोटाच्‍या भागात सुद्धा लावून मसाज करू शकतो.

५. अनेकदा अंघोळ करतांना किंवा एकूणच शरीर स्‍वच्‍छ करताना बेंबीकडे स्‍वतःचे दुर्लक्ष होते. अशा वेळी तुपाने मसाज केल्‍यास त्‍यातील चिकट घाण आणि मल दूर होण्‍यास साहाय्‍य होते.

– वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर (३१.७.२०२३)